कोरोना काळात प्रवास झाला सुखकर; रेल्वे प्रवाशांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:06 PM2020-09-16T16:06:29+5:302020-09-16T16:06:44+5:30
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवासाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
वासेफ पटेल
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवासाची कसून तपासणी करण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनिंग, सामानाचे निर्जंतुकीकरण यास प्रवाशांचे स्थानिक व ज्या गावी जाणार आहे त्या पत्त्याची नोंद करण्यात येत आहे. फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवाशांसाठी परवानगी देण्यात येत असून खऱ्या अर्थाने प्रवास आता अनुभवास येत आहे. गाडीमध्ये गर्दी नसल्याने प्रवाशांचा सुखकर प्रवास होत आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता भुसावळरेल्वे स्थानकावरील दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ज्या प्रवाशानजवळ कन्फर्म (आरक्षित) तिकीट असतील अशा प्रवाशांना प्रवाशांची मुभा आहे. प्रवेशद्वारावरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्येक प्रवाशाची थर्मल क्लिनिंग केली जात आहे. प्रवाशांची स्थानिक व ज्या गावी जाणार आहे त्या पत्त्याची नोंद करण्यात येत असून कोणत्या गाडीत, कोणत्या सीटवरून प्रवास करणार आहे याची अचूक माहितीही नोंद करण्यात येत आहे. तसेच फलाटावर दाखल होण्यापूर्वी प्रवाशांसोबत असलेल्या सामानाचे मशीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
भुसावळवरून धावतात ४४ गाड्या
भुसावळ रेल्वे स्थानकावरून कोरोना काळामध्ये अपडाऊनच्या दिशेने तब्बल ४४ गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. भुसावळ जंक्शनचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी गाड्यांचा जास्त वेळ थांबा आहे. या ठिकाणी स्वच्छता सॅनिटायझेशन, प्रसाधनगृहासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते.
प्रवास सुखकर
कोरोना पूर्वी रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे बाजाराचे स्वरूप प्राप्त होत असे. वेटिंग, कन्फर्म, जनरल तिकीटधारकांना प्रवेश असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत होती व अनेक वेळा फक्त गाडीत बसून कसा तरी प्रवास करून जाण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. खºया अर्थाने प्रवास काय हे आता कोरोना काळात दिसून येत आहे. फक्त ज्या प्रवाशांचे कन्फर्म तिकीट असतील अशा प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत असून, गाडीमध्ये एकाही वेटिंग तिकीटला परवानगी नाही. जो-तो आपापल्या सीटवर सुखकर प्रवास करीत आहे. असेच नियम कोरोनानंतरही रेल्वे प्रशासनातर्फे बंधनकारक करावे. अर्थातच फक्त कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशा पद्धतीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातत्याने होते उद्घोषणा
रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या गाईडलाईननुसार प्रवाशांनी सतर्क रहावे. काळजी घ्यावी याकरिता मास्क वापरावे. वेळोवेळी हात धुवावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नको त्या ठिकाणी स्पर्श करू नय.े याशिवाय इतर कोरोना संबंधित गाईडलाईनच्या वेळोवेळी रेल्वेस्थानकावरून घोषणा करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे. प्रत्येक प्रवाशाची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनिंग, सामान निर्जंतुकीकरण, याशिवाय गाडीत प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून प्रवास करण्यावर भर देण्यात येत आहे.
-युवराज पाटील, सीनियर डीसीएम, भुसावळ विभाग