न्यायाधीशांनी पंचनामा केल्यानंतरही मृतदेह घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:32 AM2020-03-09T11:32:21+5:302020-03-09T11:33:05+5:30
जळगाव : न्यायालयीन कोठडीत असताना सुनील भागवत तारु (४०) या तरुणाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आरोप व संताप पाहता रविवारी ...
जळगाव : न्यायालयीन कोठडीत असताना सुनील भागवत तारु (४०) या तरुणाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आरोप व संताप पाहता रविवारी न्यायाधीशांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनगृहात येवून तब्बल ३५ मिनिटे इनकॅमेरा पंचनामा केला. दरम्यान, सुनील याला मारहाण करणारे, अटक करणारे व रुग्णालयात सोडून जाणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
दरम्यान, तत्पूर्वी सकाळी याच मागणीसाठी सुनील याची पत्नी, आई, बहिण व इतर सर्व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पेठ पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला,मात्र नातेवाईक आपल्या भूमिकेवर ठाम होते. न्यायालयीन चौकशीचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलक रस्त्यावरुन उठले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात पोलिसांचा वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शवविच्छेदनासाठी डॉक्टर मिळेना
न्यायाधीशांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी एक डॉक्टर उपस्थित होते, तर इतर समितीतील डॉक्टर उपस्थित नव्हते. रविवार सुटीचे कारण दिले जात होते. त्यामुळे शवविच्छेदनासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. वादग्रस्त प्रकरणात शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपस्थित नसल्याची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे.
पट्टा व काठीने मारहाण केल्याचा आरोप
सुनील याची पत्नी मंगला यांनी शनिवारी मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात सुनील यांच्या पायावर मांडीवर तसेच गुदद्वाराजवळ जखम झालेली असून जामडी पट्टा व काठीने मारहाण झाल्याच्या खुणा आहेत. तसेच त्यांच्या डोक्यात मेंदूजवळ गाठ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अटक करण्यापूर्वी ते आजारी नव्हते, किंवा शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. २९ फेब्रुवारी ते ३ मार्च या काळात त्यांना कारागृहात अधिकारी किंवा बंदीस्त कैदी यांनी मारहाण केली आहे व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे मंगला तारु यांनी म्हटले आहे. या घटनेस जबाबदार असलेले कडू जगन्नाथ तारु, सोनी कडू तारु (चांगदेव, ता. मुक्ताईनगर) लीलाबाई धोंडू कोळी (रा.तासखेडा, ता.रावेर), पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर व भुसावळ कारागृहाचे अधिकारी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्नीने केली आहे.
पत्नी, आई व मुलांचा आक्रोश
सुनील तारु यांचा मृत्यू झाल्याने पत्नी मंगला, आई गुंफाबार्ई, मुलगी मोनाली (१३), भावना (११), मुलगा यश(८), बहिण सुमित्रा व अनिता यांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. गेल्या तीन दिवसापासून कुटुंब रुग्णालयात आक्रोश करीत आहेत. मृत सुनील याचा काका कडू तारु हा शिक्षक असून शेती व प्लॉट याच्या कारणावरुन ८ ते १० वर्षापासून भांडण करीत असल्याचे पत्नी मंगला यांचे म्हणणे आहे.
न्यायालयीन व सीआयडी चौकशीचा घोळ
सुनील तारु याचा मृत्यू कोठडीत असताना झाल्याने त्याची सीआयडी चौकशी होईल, न्यायाधीश देखील मृतदेहाचा पंचनामा करुन चौकशीचे आदेश देतील, असे आश्वासन पोलिसांकडून दिले जात होते. मात्र सुनील याला वारंटमध्ये अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी अर्थात कारागृहात रवानगी केली. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्याची त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच काळात त्याची न्यायालयाने गुन्ह्यात निर्दोष मुक्तता केली.परंतु प्रकृत चिंताजनक असल्याने त्याची रुग्णालयातून सुटका झालेली नव्हती. न्यायालयीन कोठडीत असतानाच रुग्णालयात दाखल झाल्याने तेथे त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी नव्हे, तर न्यायालयीन चौकशी होऊ शकते. पोलीस कोठडी मृत्यू असेल तर सीआयडी चौकशी होऊ शकते, याचे स्पष्टीकरण सीआयडीने पोलिसांना दिले. त्यानंतर दुपारी २ वाजता न्यायाधीशांनी शवविच्छेदनगृह गाठले. २.३५ पर्यंत त्यांनी इनकॅमेरा पंचनामा केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, महेंद्र बागुल व दोन पंच असे शवविच्छेदनगृहात होते तर पोलीस निरीक्षक अकबर पटेल हे बाहेर नातेवाईकांची समजूत घालत होते.
एस.पींनी फटकारल्यावर डॉक्टर वठणीवर
सुनील तारु याच्या मृतदेहाचा न्यायाधीशांनी पंचनामा केल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत शवविच्छेदन करणारे डॉक्टर उपलब्ध नव्हते. जे डॉक्टर हजर झाले, त्यांनी पॅथॉलॉजिस्ट असल्याशिवाय शवविच्छेदन करणार नसल्याचा पवित्रा, त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. दुसरीकडे नातेवाईक आणखीनच संतप्त होत होते. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी संभाव्य घटनेला तुम्हीच जबाबदार असाल अशा शब्दात डॉक्टरांना फटकारले. संवेदनशील प्रकरणात वारंवार असाच प्रकार होत असल्याचे डॉ.उगले यांनी अधीष्ठातांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटी वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन डॉ.उमेश कोल्हे या पॅथॉलॉजिस्टला पाचारण केले, त्यानंतर डॉ.दीपक जाधव, डॉ.निलेश देवराज व डॉ.कोल्हे या तिघांनी सात वाजता शवविच्छेदन केले.