ताणतणावातून जामनेरच्या पोलिसांना सुटकेचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 03:07 PM2019-07-06T15:07:44+5:302019-07-06T15:10:14+5:30
सध्या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात.
सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न, अपूर्ण मनुष्यबळ आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या यामुळे ५७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर जामनेर शहरासह तालुक्यातील ७९ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांची सुरक्षा अवलंबून आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पारदर्शक कारभार नव्या योजना, नवे रुप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत वाटचाल करीत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदांची वर्दळ असते. मात्र अपुºया संख्या बळामुळे जादा कामाने कर्मचाºयांचा मानसिक ताण वाढला आहे.
ताण तणाव
पोलीस म्हणजे संरक्षण... पोलीस म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण... पोलीस म्हणजे आरोप प्रत्यारोप..... पोलीस म्हणजे ताण तणाव ..... पोलीस म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन... अन् पोलीस म्हणजे आॅन ड्युटी चोवीस तास...
गुन्हे जास्त... गावे जास्त... लोकसंख्या जास्त... घात-अपघात जास्त... अन् पोलिसांची संख्या तुटपुंजी...
ताण तणावात जीवन जगणाºया, पण जागल्याच्या भूमिकेत सेवाकार्य करणारी पोलीस यंत्रणा कायम आरोपींच्या पिंजºयात उभे असते.
अशा या जनसेवक पोलिसांना कधीकधी आत्महत्या कराव्या लागल्याच्या दुर्घटनाही घडतात. कधीकधी वरिष्ठांवर तणावातून गोळ्या झाडल्याच्याही घटना घडल्या आहेत .
अशा पोलिसांना कधीकधी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करावे लागते, तर तणावातून अनेकविध पोलिसांना हार्ट अॅटकही आले....
तणाव मुक्तीसाठी व्हॉलिबॉल
सध्या या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात.
पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांचे मार्गदर्शन व उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या सहाकार्याने मोकळ्या पटांगणावर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे.
नित्य कामकाज आटोपून येथील पोलीस कर्मचारी आता तणावमुक्तीचा एक मार्ग म्हणून सराव करतात.
कोणत्याही परिस्थितीतून मानसिक व शारीरिक पातळीवर संयम व शांतीचा मार्ग म्हणून खेळाला महत्त्व आहेच. सोबत बरीच पोलिसांना आत्मिक बळही मिळते. काही तर सकाळ संध्याकाळ फिरणे पसंत करतात, तर काही मंडळी योगासने व प्राणायाम (योग) ही करतात.
जामनेरच्या पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामनेरच्या पोलिसांचा हाच कित्ता इतर सर्वच पोलीस बांधवांनी गिरवला तर नक्कीच मानसिक समाधान लाभेल !
खेळ खेळल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि खिलाडू वृत्ती वाढते व शरीर काम करण्यास फिट राहते. खेळामुळे आजार लागत नाही.
-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, जामनेर