आत्मविश्वासाने ‘सीए’ क्षेत्रात गगन भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:30 PM2019-09-29T12:30:59+5:302019-09-29T12:31:19+5:30
नवप्रेरणा
जळगाव : डॉक्टर, अभियंता होण्यापेक्षा काही तरी वेगळे करण्याचा विचार करीत शिक्षण घेत असतानाच सीए व्हावे, असा निश्चय करीत आत्मविश्वास, चिकाटी या बळावर स्मिता बाफना यांनी हा निश्चय पूर्णदेखील केला आहे. विशेष म्हणजे केवळ सीए होऊन तेवढ्यावरच न थांबता त्यांनी सीए संघटनेचे विविध पद भूषवित आज अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळत आहे व एक महिलादेखील या क्षेत्रात गगण भरारी घेऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
स्मिता बाफना यांचे माहेर जळगावचेच. येथेच त्यांचे शिक्षण झाले. घरात वडिलदेखील सीए. विशेष म्हणजे वडील लग्नानंतर सीए झाले व त्यामुळे आपण इयत्ता चौथीत असतानाच सीए होण्याचे ठरविल्याचे स्मिता बाफना यांनी सांगितले. शाळेत असताना मैत्रिणी डॉक्टर, अभियंता होणार असल्याचे ठरवित होते. मात्र आपण यापेक्षा काही तरी वेगळे करायचे, असा विचार केला. त्यात वडिलांचा आदर्श डोळ््यासमोर होता. त्यानंतर तर इयत्ता दहावीमध्ये असताना ‘मेरी महत्त्वकांक्षा’ हा निबंध लिहिताना सीए होण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे आपण त्यात लिहिल्याचे बाफना यांनी सांगितले. या स्पर्धेत आपल्याला पुरस्कारही मिळाला व ते एक प्रोत्साहन ठरले आणि सीएची वाटचाल सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. घरात तीनही बहिणीच असल्याने त्यामुळे अधिक जबाबदारी होती. ही जबाबदारी पेलण्याचे ठरविले आपण सीएचा टप्पा पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.
लग्नापूर्वीच सीए झालेल्या बाफना यांना जोडीदार मिळाले तेदेखील सीएच. त्यामुळे सासरीदेखील माहेरप्रमाणेच सीएचे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे सीएच्या कामात सातत्य राहत अखंडीतपणे हे काम सुरू ठेवत या क्षेत्रात बाफना यांनी एक वेगळा ठसा उमटविला.
सीएचे काम करीत असताना सीए संघटनेचे सदस्यत्व त्यांना मिळाले. २०१६मध्ये त्या संघटनेच्या ‘स्टुडंट विंग’च्या अध्यक्षा झाल्या. हे काम करीत असताना त्यांनी या विंगच्या जळगाव शाखेला प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार मिळवून दिला. संघटनेतील कार्य पाहता त्यांची जबाबदारी वाढत गेली. २०१७मध्ये त्यांनी संघटनेच्या सचिव तर २०१८मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम संभाळले. त्या नंतर तर थेट संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली.
आज ही जबाबदारी यशस्वीपणे संभाळण्यासह त्या गृहिणी म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडत आहे. मुलगा इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असून सीएचे काम करीत असताना मुलाच्या शिक्षणावरही लक्ष देत असल्याचे बाफना यांनी सांगितले. या सर्व कार्यासाठी आई, वडील, सासू-सासरे, पती, नणंद यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचे बाफना यांचे म्हणणे आहे.
प्रत्येक महिला ही सक्षम आहे. तिने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात झेप घेऊ शकते. स्वत:वर विश्वास ठेवा, कोणतेही काम अशक्य नाही. ‘हम किसीसे कम नही’ अशी भावना ठेवून मीदेखील आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली व या क्षेत्रात मी यशस्वी झाले.
- स्मिता बाफना, अध्यक्षा, सीए असोसिएशन, जळगाव शाखा.