कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरणार!
By अमित महाबळ | Published: December 5, 2023 07:23 PM2023-12-05T19:23:51+5:302023-12-05T19:24:37+5:30
सूत्रसंचालन प्रा. उमेश पाटील, प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले.
अमित महाबळ, जळगाव : शासन स्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक व वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा मूळजी जेठा महाविद्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.
कार्यशाळेला सहायक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील, घनश्याम गवळे, प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य करुणा सपकाळे, आर. बी. ठाकरे, जुक्टो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एल. डी. सोनवणे म्हणाले, की जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या आस्थापनेवर कार्यरत असणारे, त्याचबरोबर रिक्त पदे, वाढीव पदे व अद्ययावत बिंदूनामावली यांची माहिती दिलेल्या प्रपत्रात भरून द्यावी. ही माहिती डिसेंबर महिना संपण्यापूर्वी भरून द्यायची आहे. कार्यशाळा आयोजनासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. उमेश पाटील, प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले.
एकच बिंदूनामावली करावी लागणार...
- संस्थेने एकापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावतरित्या भरून संपूर्ण संस्थेची एकच बिंदूनामावली तयार करावी. शासनस्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे आहे. नाशिक विभागात एकूण ७९ पायाभूत पदे असून, १७ पदे अतिरिक्त ठरलेली आहेत. या सर्व पदांचे समायोजन करण्यासाठी परिपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे, असे एल. डी. सोनवणे यांनी सांगितले.