बरा कुणबी केलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:11 PM2018-09-22T15:11:10+5:302018-09-22T15:11:25+5:30
‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...
बैलांची निर्बुद्ध म्हणून संभावना करणे हादेखील माणसाचा निर्बुद्धपणाच. शेतीमातीचे कधी विठ्ठल वाघ, तर बैलांना आपले म्हणजे माणसाचे ‘दूधभाऊ’च मानतात. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांचा युक्तीवाद असा आहे की, बैल लहान वासरं असतात तेव्हा गाईचे दूध पितात. गाईचे दूध पिऊनच वासरांचे बैल होतात. माणूसही लहान मूल असताना आईच्या दुधासोबतच गाईचे दूध पितो. मुलांची माणसं होताना गाईच्या दुधाचा वाटा आहेत. याचा अर्थ गाय ही जशी बैलांची आई तशी माणसांचीही.
आमच्या गावचा एक शेट सावकार शेतीमातीत राबणाऱ्या श्रमिकांची बैलांसोबत मातीत राबणारे बैल अशा शब्दात संभावना करायचा. बैल म्हणजे निर्बुद्ध या अर्थाने त्यांची अवहेलना करायचा. पण अनेक कृषीकर्मे अशी आहेत की, अंगी उपजत शहाणपण असल्याशिवाय ती नीटनेटकी योग्य प्रकारे करता येत नाही. शेतीमातीत श्रमणाºया श्रमिकांच्या अंगीही कसबी कसब असत हे जागेवर बसल्या बसल्या आडल्या नडलेल्यांचं शोषण करणाºया त्या सावकाराला कसं सांगावं? तिफन हाकणं, पेरणीची मूठ धरणं ही तर कौशल्याची कामे आहेतच, पण कृषी कार्यात इतरही अशी काही कामे आहेत की, जी अंगी कौशल्य असणाºयांनाच फक्त जमतात.
कडब्याचा भर रचणे, कडब्याचा गुड घालणे, कणसांचा पुंज लावणे, कुंपण (काट्यांचे) घालणे अशा काही कृषी कार्यातून शेतात राबणाºया श्रमिकांच्या अंगी असणारे कौशल्य सहज नजरेत भरतं. कडब्याचा भर रचायचा तर उंच भराच्या गाडीचा गुरुत्वामध्ये गाडीच्या दोन चाकाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते नाही तर बैलगाडी पलटून अपघात होण्याचा धोका असतो. कडब्याचा गुड असा घालायचा की अवकाळी पावसाचे पाणी गुडात जाऊन कडबा कुजणार नाही. कणसांचा पुंजा असा घालायचा की पुंजातून एक कणीस कुणी काढले तरी पाहणाºयाच्या लक्षात यावे. काट्याचे कुंपण असे लावायचे की, वाटावं जणू भिंत बांधली आहे. अंगी शहाणपण असल्याशिवाय ही कौशल्ये सहज साध्य नाहीत. यावरून शेतीमातीत राबणाºया श्रमिकांची बैल, निर्बुध्द म्हणून अवहेलना करणे म्हणजे अज्ञान, मग्रुरीच आहे एक प्रकारची.
बैलांना निर्बुध्द म्हणून संबोधणे, त्यांना समज नसते असे समजणे हा खरेतर माणसाचा असंमजसपणाच आहे. बैल निर्बुध्द, असमंजस नसतात हे मी स्वत: अनुभवलंय, पाहिलंय. तेव्हा श्ोतीतल्या कामासाठी आमच्याकडे जगू महेनदार होता. बैलांवर त्याचा फार जीव. रोजच्या सहवासातून बैलांशी त्याचे स्नेहबंधच जुळून आले होते. शेतात न्याहरी करताना जगू बैलांना घास द्यायचा म्हणून दोन घास भाकरी शिल्लक ठेवायचाच. आपली न्याहरी झाल्यावर बैलांना घास भरवून मगच तो पाणी प्यायचा. रात्री जेवण झाल्यावर चारा सामोर करायला आला म्हणजे बैलांशी त्याचा संवाद सुरू असे. तो जसा बैलांना जीव लावायचा तसाच बैलही त्याच्यावर जीव टाकायचे. बैलांना शेतात चारायला घेवून जाताना जगू रस्त्यात कुणाजवळ बोलत उभा राहिला तर बैलही जरा अंतरावर जावून जगूच्या येण्याची वाट पहात उभे रहायचे. जगू आल्याशिवाय पुढे जायचे नाहीत. एकदा शेतात मी आणि जगू बेढ्याच्या झाडाखाली सावलीत गप्पा करत बसलो होतो. बैल बांधावर चरत होते. आमचं लक्ष नाही असं पाहून ‘पाखºया’ नावाचा बैल बांधावरून बाजूला होत शेतात घुसला आणि पीक ओरबडायला लागला. लक्ष गेल्यावर बसल्या जागेवरून जगू एवढच म्हणाला, ‘‘पाखºया होऽऽ’ जगूचा आवाज ऐकल्याबरोबर पाखºया परत बांधावर जाऊन चरायला लागला. त्याला बरोबर समजलं जगू आपल्याला शेतात नाही तर बांधावर चरायला सांगतो. असे काही प्रसंग पाहिले, अनुभवले तर बैलांनाही जाण असती जाणीव असते हे सहज जाणवतं. बैलांना जीव लावला तर ते देखील जीव लावणाºयावर जीव टाकतात याचे प्रत्यंतर येते.
महेनदारी कालबाह्य झाल्याने आता बैला माणसातले स्नेहबंध फारसे अनुभवाला येत नाहीत. खेड्यावरही बैलांची गायी वासरांची संख्या खूप कमी झालीय. ज्या ेशेतकºयाच्या घरी पूर्वी चार बैलजोड्या असत त्या शेतकºयाकडे आता मुश्किलीने एखादी जोडी असते. शेतीची खूप सारी मशागत आता ट्रॅक्टरच्या, यंत्राच्या सहाय्याने व्हायला लागली आहे. गाईगुरांची संख्या घटल्याने गावी पूर्वीसारखे गोठणं, गव्हारं नाहीत की गायरानं. पूर्वी गव्हारातली गुरं सकाळी आधी गोठनावर जमत, दिवसभर गायरानात चरून संध्याकाळी मावळतीला गावात येत. गव्हारातल्या खूप साºया गाईवासरांच्या एकत्र चालण्याने उडणाºया धुळीने आसमंत व्यापून जायचा. गायीगुरांच्या चालण्याने संध्याकाळी उडणारी ही धूळ, धुळीचे कण म्हणजेच गोरज. म्हणून संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असतानाचा मुहूर्त तो ‘गोरज मुहूर्त.
-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर