जामनेरच्या अण्णा सुरवाडे यांच्या गाण्यांना तरुणाईची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 06:38 PM2019-06-22T18:38:54+5:302019-06-22T18:39:01+5:30
केसावर फुगे। गाण्याला तरुणाईकडून पसंती
जामनेर : तालुक्यातील वाकी येथील युवक अण्णा सुरवाडे यांना शाळेत शिकत असताना लागलेली गाण्याची आवड त्यांना आज यशाच्या शिखराकडे नेत आहे. ‘केसावर फुगे’ हे त्यांचे हीट झालेले गाणे यंदाच्या लग्नसराईत डीजेवर वाजविले गेले. या गाण्यावर लहान थोर सर्वच वयोगटातील बेधुंद होऊन नाचत होते. यू ट्यूबवर सध्या त्यांची ८० पेक्षा जास्त गाणी वाजत आहेत.
वाकी या छोट्या गावात जन्म झालेल्या अण्णा सुरवाडे यांचे अत्यंत प्रतीकुल परिस्थीतीत आई वडिलांनी मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण केले. नववीत शिकत असताना त्यांना गाण्याची आवड लागली. गावात लग्न आदी कार्य असले की, अण्णा बँडवर गात असे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पथनाट्य व विविध स्पर्धांच्या माध्यमातून गाणे गात असताना ते लोककलेकडे वळले. ‘कॉलेज सुटल्यावर ‘इलू म्हणशील का ’ हा त्यांचा पहिला अल्बम राज्यात गाजला.
भीमसागर, सुविधांचा शृंगार, राजे सोंग, भजन आदी अनेक गाणी त्यांनी गायिली. यासाठी त्यांना शेंदूर्णी येथील संगितकार सचिन कुमावत यांची मदत झाली. रेकॉर्डिंगसाठी बोलावून कुमावत यांनी गाण्याचे अल्बम तयार केले. सुरवाडे हे कुमावत यांच्यासोबत गेल्या १२ वर्षांपासून काम करीत आहेत. केसावर फुगे व मामा तुमची मुलगी लय सुंदर ही गाणी सुपर हिट ठरली.