जळगावकरांना आज अनुभवता येणार गुरू-शुक्राची युती; १५ वर्षानंतर दिसणार विलोभणीय क्षण
By Ajay.patil | Published: February 28, 2023 07:18 PM2023-02-28T19:18:20+5:302023-02-28T19:18:41+5:30
खगोलप्रेमींसह जळगावकरांना बुधवारी दुर्मीळ व विलोभणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार असून, बुधवारी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे.
जळगाव, अजय पाटील- खगोलप्रेमींसह जळगावकरांना बुधवारी दुर्मीळ व विलोभणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार असून, बुधवारी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे. ही अशी युती १५ वर्षानंतर दिसत असून पुन्हा पाहण्यासाठी १५ वर्षाची वाट पहावी लागणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
त्यामुळे बुधवारी हा दुर्मीळ योग खगोलप्रेमींसह जळगावकरांना अनुभवता येणार आहे. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. १ मार्च रोजी हे दोन्ही ग्रह जवळ येणार असून, ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठीचीही दुर्मीळ संधी आहे .ही युती भासमान युती आहे, जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वी पासून त्यांचे अंतर खुप जास्त आहे. बुधवारी शुक्र पृथ्वीपासुन २० कोटी ५६ लाख ३१ हजार १४१ किमी तर गुरू ८६ कोटी १८ लाख ४३ हजार १९२ कोटी किमी अंतरावर असतील. बुधवारी दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल.
यादरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरुची तेजस्विता -२ ० असेल. ५ मार्च पर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्याकमी अंतरावर असतील. त्यानंतर मात्र गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल. दरम्यान, या दुर्मीळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होता यावे यासाठी जळगाव खगोलप्रेमी गृप व मु.जे.महाविद्यालय भुगोल विभागाकडून ही घटना पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी खगोलप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मु.जे.महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.