केवळ देखाव्यासाठीच काळजी घ्यायची का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:03 PM2018-11-24T13:03:17+5:302018-11-24T13:04:14+5:30
शालेय पोषण आहाराचा विषय नेहमीच गाजत असतो
हितेंद्र काळुंखे
जळगाव : शालेय पोषण आहाराचा विषय नेहमीच गाजत असतो. कधी पुरवठादार हा मालाचा पुरवठा व्यवस्थित करीत नाही तर कधी शाळेमध्ये पोषण आहार देण्याचे काम योग्यरित्या होत नाही. वास्तविक विद्यार्थांच्या शैक्षणिक पोषणासााठी त्यांचे शारिरिक पोषणही चांगले होणे महत्वाचे आहे, यादृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार सुरु केला आहे. मात्र या योजनेचा बऱ्याचदा फज्जा उडाल्याचे दिसून येते. अनेक कमतरता अनेक ठिकणी दिसून येतात.
यामुळेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाची शालेय पोषण आहार समिती येणार आहे. या समितीसमोर पोषण आहारातील कमतरता समोर येवू नये म्हणून नुकतीच एक बैठक घेवून मुख्याध्यापकांना मार्गदशन करण्यात आले. तालुकास्तरीय या बैठकीत शालेय पोषण आहाराच्या कामकाजासह विविध २८ मुद्यांच्या माहितीच्या तपासणीसाठी ही समिती येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यापकांनी जबाबदारीने कार्यवाही करून सर्व अभिलेख पूर्ण ठेवावे, अशा सुचना तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी मुख्याध्यापकांना दिल्या़
अर्थात अनेक ठिकाणी हे काम जबाबदारी ने पार पाडले जात नाही,हे स्पष्ट असल्यानेच ही बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या. समितीसमोर तरी बोगस कारभार येवू नये याची काळजी घेण्यासाठी हे प्रयत्न झाले, असेच म्हणावे लागेल.
दरम्यान एखादी समिती येणार किंवा एखादी तक्रार आली म्हणजे प्रशासन याबाबीकडे लक्ष देते. परंतु असे न होता नेहमीच हे काम व्यवस्थित कसे होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ समिती येणार म्हणून दिखाव्यासाठी चांगले काम नको, तर ते नेहमीच चांगले होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे. नेहमीच अधूनमधून अचानक विविध शाळांवर भेटी देवून पोषण आहार वाटपाचे काम कसे सुरु आहे, याची पाहणी करायला हवी. यावेळी दोषी आढळणाºयांवर कारवाई झाल्यास अचानक होणाºया तपासणीच्या भितीने हे कामकाज बºयाच प्रमाणात सुधारु शकते.