स्विकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:21 PM2019-12-16T22:21:27+5:302019-12-16T22:21:32+5:30
जळगाव : मनपातील भाजपच्या चारपैकी दोन सदस्यांच्या जागेवर इतर दोन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपणाऱ्या दोन ...
जळगाव : मनपातील भाजपच्या चारपैकी दोन सदस्यांच्या जागेवर इतर दोन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपणाऱ्या दोन सदस्यांच्या जागेवर इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपकडून चार सदस्यांपैकी कैलास सोनवणे व विशाल त्रिपाठी यांना कायम ठेवण्यात येणार असून, इतर राजेंद्र मराठे व महेश चौधरी यांच्या जागेवर इतरांना संधी दिली जाणार आहे.
महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून काही फेरबदल करण्यात येणार आहेत. महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांना दिलेला कार्यकाळाची मुदत संपत आल्याने महिनाभरात महापालिकेत नवीन महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आधीच सांगितले आहे. आता स्विकृत सदस्यांपैकी दोन सदस्यांच्या जागेवर भाजपच्या इतर सदस्यांची वर्णी लागणार आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व घडामोडींना वेग येणार दिली आहे.
दोन स्विकृत सदस्यांचा जागेवर नियुक्ती होणाºया इतर सदस्यांसाठी भाजपातील अंतर्गत गट सक्रीय झाले आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये अनेक गट-तट आहेत. त्यामुळे दोन सदस्यांच्या रिक्त होणाºया जागेवर आपल्याच गटातील व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली जात आहे. अंतीम निर्णय गिरीश महाजन हेच घेणार असल्याची माहिती मिळाली.
पाच नगरसेवकांबाबत मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपा अधिनियम कलम १२ नुसार अपात्रतेची कारवाई करण्याची गरज होती. मात्र, दोन महिने होवूनही आयुक्तांनी कारवाई न केल्यामुळे आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी प्रधानसचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडे देखील तक्रार के ली आहे.
‘त्या’ पाच नगरसेवकांच्या सुनावणीकडेही लक्ष
घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे, कैलास सोनवणे यांना अपात्र का करण्यात येवू नये हा जाब विचारत मनपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच १७ डिसेंबर रोजी या सर्व नगरसेवकांची सुनावणी देखील घेण्यात येणार आहे. या सुनावणीनंतर या नगरसेवकांवर मनपाकडून अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनावणीकडेही लक्ष लागले आहे. पाच पैकी कैलास सोनवणे हे स्विकृत नगरसेवक आहेत. तर इतर चार सदस्य जनतेतून विजयी झाले आहेत. सोनवणेंवर कारवाई झाल्यास त्यांच्या जागेवरही भाजपला इतर सदस्याची नियुक्ती करावी लागणार आहे.