दोन मिनिटातच तरुणाला ५७ हजाराचा ऑनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:01+5:302021-09-26T04:19:01+5:30
जळगाव : गुगल पे व्हाऊचर विड्रॉ करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क साधणे प्रदीप धनराज निकम (वय ३८,रा.जिजाऊ नगर) या तरुणाला ...
जळगाव : गुगल पे व्हाऊचर विड्रॉ करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क साधणे प्रदीप धनराज निकम (वय ३८,रा.जिजाऊ नगर) या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कस्टमर केअरवर संपर्क साधल्यावर अवघ्या दोन मिनिटात ५७ हजार रुपयात ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पहिल्या वेळेस ३३ हजार व दुसऱ्या वेळेस २४ हजार रुपये या तरुणाच्या बँक खात्यातून कपात झाले आहे. शनिवारी दुपारी साडे तीन वाजता हा प्रकार घडला.
प्रदीप निकम हा तरुण एमआयडीत चटई कंपनीत कामाला आहे. पाच हजार रुपयांची गरज भासल्याने त्यांनी गुगल पे वरुन व्हाऊचर विड्रॉल करण्यासाठी गुगल पे चा कस्टमर केअरचा क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने लिंक पाठविली. त्या लिंकवर क्लिक करताच काही सेंकदात ३३ हजार रुपये बँक खात्यातून कपात झाले, त्यानंतर २४ हजार रुपये कपात झाले. पैशांचा व्यवहार होण्याऐवजी आपले बँक अकाऊंट हॅक झाल्याचे समजताच निकम यांनी सायबर व रामानंद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. दोन्ही ठिकाणी त्यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, लिंक पाठवून किंवा ओटीपी विचारुन ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ चालली आहे, अशा प्रकारचे व्यवहार करताना अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करु नये, किंवा ओटीपी क्रमांक तसेच एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.