पॉझीटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील एक तरूण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:11 PM2020-03-25T12:11:46+5:302020-03-25T12:12:01+5:30
नमुने घेतले : २८ जणांचे नमुने निगेटीव्ह, एक संशयित नवीन कक्षात
जळगाव : पुणे येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला व लक्षणे जाणवू लागलेल्या चोपड्याच्या एका तरूणाला मंगळवारी कोरोना कक्षात दाखल करण्यात आले़ त्याच्या लाळेचे नमुने घेऊन ते पुणे येथे पाठविले आहे़
आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २८ जणांचे नमुने निगेटीव्ह आलेले असून एका जणाचा अहवाल प्रशासनास प्राप्त झालेला नाही़ नवीन या संशयिताला दाखल केले आहे. मंगळवारी दाखल तरूणाचे बुधवारी सायंकाळपर्यंत नमुने अपेक्षित आहेत़ सोमवारपर्यंत दाखल सर्व संशयिताचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.
किट, मास्कचा तुटवडा?
शासकीय रूग्णालयात मास्क, सॅनिटायझर व किटचा तुटवडा असल्याचे वृत्त आहे़ याबाबत रूग्णालय प्रशाससनाने शासनाकडे पत्रही पाठविले मात्र दहा दिवसानंतरही हा पुरवठा झालेला नसल्याचे समजते़
ग्रामीण रूग्णालयात अडचणी?
मुंबई, पुणे येथून थेट गावात जाणाऱ्यांसाठी ग्रामीण रूग्णालयात नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र, या ठिकाणी पुरेसे किट नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शासकीय रूग्णालयात आहे तेवढे किट वापरा असे, सांगण्यात आले मात्र, मुख्यालयातच किटचा तुडवडा असल्याने ग्रामीण रूग्णालयात नेणार काय ? असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे़ तुटवड्याबाबत रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचाल कार्यालयाकडे दहा दिवसांपूर्वी मागणीचे पत्र पाठविल्याची माहिती आहे़ त्यामुळे आहे त्या साठ्यात काटकसरीने काम सुरू असून आहे तो साठा आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे़
व्हँटीलेटरचा मुद्दा ऐरणीवर
शासकीय रूग्णालयाच्या कोरोना कक्षात सध्या एकच व्हँटीलेटर असून अन्य सहा व्हँटीलेटर हे अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आहे़ अशा स्थितीत अचाकन रूग्णांची संख्या वाढल्यास पर्याय काय ? असा गंभीर प्रश्न यंत्रणेसमोर आहे़ यासाठी अखेर रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून भाडे तत्त्वावर हे व्हँटीलेटर तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत़
शासकीय रूग्णालयात मास्क व सॅनिटायझर तसेच किट पुरेसे आहे़ याचा तुटवडा नाही.
- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता