अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:03 PM2019-06-14T19:03:00+5:302019-06-14T19:05:10+5:30
शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
देशभरात नदी शुद्धीकरण, स्वछता अभियान राबविले जात असताना अमळनेर नगरपरिषदेकडून मात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. गांधलीपुरा पुलाजवळ बोरी नदीपात्रात शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. कच-यातील प्लॅस्टिक नदीपात्रात सर्वत्र पसरून त्याचा सिंचनावर परिणाम होत आहे. वाहते पाणी दूषित होऊन त्याचा नदीकाठावरील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
अमळनेर पालिकेने घनकचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. मात्र, ठेकेदार नियमावलीचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेकेदाराने शहरातून गोळा केलेला कचरा डेपोत टाकून त्याच्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र, ठेकेदाराकडूनच नदीपात्रात कचरा टाकून शहराचे आरोग्य धोक्यात आणले जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. संबंधित ठेकेदारावर अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
आरोग्य विभाग व ठेकेदाराला नदीपात्रातील कचरा ताबडतोब उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्याचे आरोग्य विभागाला निर्देशित केले आहे.
-शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर