‘कडकनाथ’च्या कंपनीने घातला सव्वादोन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:30 PM2019-08-29T18:30:14+5:302019-08-29T18:31:08+5:30
पुरक व्यवसायाचे स्वप्न पहाणाऱ्यांना धक्का : नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल
मतीन शेख
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कंपनीने जिल्ह्यातील ईमुपालन करणाºया शेतकऱ्यांना चुना लावल्यानंतर आता दुसºया एक कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून मालामाल करण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील ७० शेतकºयांना सव्वादोन कोटी चा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या व्यवसायातून श्रीमंतीचे स्वप्न पहाणाºयांचे धाबे दणाणले आहे.
कडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. ही कोंबडी काळी, तिचे रक्त काळे, मांस काळे आणि होणारा रस्साही काळा असल्यामुळे या कोंबडीचे अनेकांना आकर्षण वाटते.
असा होता व्यवसाय
७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ३०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी आदी घ्या आणि अवघ्या १० महिन्यात किमान २ लाख ७५ हजार रुपये मिळवा, अशी योजना आखून तिचा प्रसार करण्यात आला. जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी या ‘कडकनाथ’च्या मोहजाळात फसल्याचे आता समोर येत आहे.
गेल्या वर्षी आली कंपनी
जुलै २०१८ पासून कडकनाथच्या या कंपनीने जिल्ह्यात पाय ठेवला आणि वर्षभरात सुमारे ७० शेतकºयांनी या कडकनाथ चा व्यवसाय सुरू केलात्न अवघ्या वर्षभरात कंपनीने गाशा गुंडाळल्याचे चित्र असून सत्तर शेतकºयांचे सुमारे सव्वादोन कोटी रुपये यात अडकले आहे . जळगाव येथे पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात एका ग्राहकाकडेच समन्वयकाची जबाबदारी या कंपनीने सोपविली होती. सुरुवातीला कंपनीकडून ७५ हजार रुपयांच्या मोबदल्यात ३०० पक्षी, खाद्य, औषधे, साहित्य आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे करारपत्र करून दिले जात होते. ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातील २०० कोंबड्या घेऊन जाते. यावेळी शेतकºयांकडे १०० कोंबड्याराहतात. त्यामध्ये २० कोंबडे ठेवले जातात. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्या की, पुढील सहा महिने कंपनी सरासरी ६० रुपये दराने अंडी खरेदी करते. त्यापोटी शेतकºयाला २ लाख ५० हजार रुपये मिळतात, असे सांगून दहाव्या महिन्यापर्यंत जिवंत असलेल्या कोंबडीला ३०० रुपये आणि कोंबडा ५०० रुपये या दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. त्यातून किमान एक लाखाचे उत्पन्न मिळेल असे स्वप्न दाखविले जात होते. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील फक्त ३ शेतकºयांना त्याचा लाभ मिळालाही आणि त्यांनी लाभाची रक्कम फेर गुंतवणुक केली. त्यानंतर कंपनीने हळूहळू गाशा गुंडाळायला सुरवात केली त्यातूनच मग अंड्यांंची खरेदी नाही, कोंबड्यांची खरेदी नाही, औषध-वैद्यकीय सेवा नाही आणि शेवटी पैसेही नाहीत. अशा चक्रव्यूहात जिल्ह्यातील शेतीपुरक उद्योग म्हणून व्यवसाय करणारे ७० गुंतवणूकदार शेतकरी अडकले आहेत. कंपनीचा बुलढाणा जिल्ह्याचा कारभार देखील जळगाव येथून हाताळला जात असे यात ३० शेतकºयांचा सुमारे ५० लाखात अडकविले आहे.
६० रुपये दराची अंडी झाली पाच रूपयांत मागणी
साठ रुपये दराने अंडी खरेदी करणारे या कंपनीने गाशा गुंडाळल्याचे चित्र असतांना बाजारपेठेत ही अंडी ५ ते १० रुपयाला विकली जात आहे. तर ३०० रुपये दराने कोंबडी आणि ५०० रुपये दराने कोंबडा कंपनी खरेदी करीत होती त्यास बाजारात फक्त ८० ते १०० रुपये दराने भाव मिळत आहे यामुळे कडकनाथ पालन करणारे शेतकरी पुरते हादरले आहेत.
पैस देऊनही कोंबड्या नाहीत
काही जणांनी कंपनीकडे बुकिंग केले तर काहीजणांनी एक व दोन युनिट खरेदीसाठी कंपनीकडे अॅडव्हॉन्स रक्कम जमा केली यातील दहा ते बारा शेतकºयांना पैसे देऊनही कोंबड्या मिळाल्या नाहीत. कडकनाथच्या व्यवसायासाठी शेतात शेड वरून तयारी केलेल्या शेतकºयांचे शेड कोंबड्यांअभावी रिकामे पडले आहे तर ज्या शेतकºयांनी कडकनाथचे पिल्ले व तीन महिन्यांच्या कोंबड्या घेतल्या आहेत त्या शेतकºयांना कंपनी खाद्य पुरवठा करीत नसल्याने कडकनाथ व्यवसाय करणाºया मोठे संकट ओढवले आहे.
राज्यभरात व्याप्ती
या कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदार ‘कडकनाथ’ च्या गोरख धंद्यात अडकले आहेत. गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने केंद्र बिंदू असलेल्या इस्लामपूर, सातारा, कोल्हापूर येथील कार्याल बंद पडल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीचे संचालक गुंतवणूकदारांना धीर धरण्याचा सल्ला देत आहे.
शेतकरी प्रतिक्रीया....
कंपनीने आम्हाला धोका दिला. मी व माझा भागीदार अशा दोघांनी साडे तेरा लाख रुपये या शेतीपूरक उद्योगात गुंतविले असून कंपनी कडून पशु खरेदी केली जात नाही तर पशु खाद्य ही पुरविले जात नाही. बाजारात ६० रुपये नगाची ही अंडी ५ ते१० रुपयात तर ३०० ते ५०० रुपयांची कडकनाथ कोंबडी ८० ते १०० रुपयात मागितली जात आहे. खाद्य अभावी पशु मरायला लागले आहे.
- अजिज खान वहाब खान
पीडित शेतकरी. यावल
----
सव्वादोन लाख रुपये गुंतवणूक करून कंपनी कडून ३ युनिट घेतले होते. आज एक रुपयाही परतावा मिळालेला नाही.पशु खाद्य मिळत व औषधी नाही. कंपनीला ८०० अंडी दिली त्याचाही मोबदला मिळाला नाही. आम्हाला गंडविले गेले आहे आणि कंपनी कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
- मुकेश सूर्यकांत पाटील, पीडित शेतकरी,जामनेर