कजगाव परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:19+5:302021-09-02T04:34:19+5:30
कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे कजगाव-नागद या मार्गाचा संपर्क तुटला. तसेच कजगाव, भोरटेक, पासर्डी, घुसर्डी या ...
कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे कजगाव-नागद या मार्गाचा संपर्क तुटला. तसेच कजगाव, भोरटेक, पासर्डी, घुसर्डी या गावाला पुराने वेढा दिला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर नदी किनाऱ्यावरील अनेक शेतातील पीक या पुराने उपटून नेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दि. ३० च्या रात्री तितूर नदीच्या उगमावर झालेल्या धुंवाधार पावसामुळे तितूर नदीला महापूर आला. काठावरील अनेक शेतकऱ्यांचे पीक या पुरात उपटून प्रवाहात वाहून गेले तर, अनेक शेतामध्ये नाले तयार झाल्याने जमिनी नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण मातीचा थरच या प्रवाहात वाहून गेला आहे.
महापुराने रौद्ररूप धारण केले होते. कजगावात उभ्या असलेल्या अंदाजे ४० ते ५० फूट उंचीच्या केटीवेअरवरून पुराच्या पाण्याचा विसर्ग सुरू होता. या महापुरामुळे कजगाव-नागद मार्ग बंद पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर या पुराने कजगाव जुनेगाव नवेगाव हा संपर्कदेखील तुटला होता.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तितूर काठावर असलेल्या जमिनीतील पीक या महापुराने गिळंकृत केले. हातातोंडाशी आलेला घास या पुराने हिरावल्यामुळे बळीराजाचे सारे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडणार आहे.
दुकानांमध्ये पाणी
पावसाळा सुरू झाल्यानंतर कजगावात दि. ३० रोजी रात्री साधारण १० वाजेच्या दरम्यान झालेल्या धुंवाधार पावसामुळे येथील बसस्थानक भागातील व्यापारी संकुलात पाणी गेल्याने या संकुलातील दुर्गेश कृषी सेवा केंद्र, प्रसाद ऑटो, गौरव बुट हाऊस, सुहाग जनरल स्टोअर्स, श्री जनरल स्टोअर्स, परफेक्ट जीन्स कॉर्नर या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक भेट
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाचोरा प्रांताधिकारी डॉ. बांदल, पोलीस निरीक्षक पडघम भडगाव, नायब तहसीलदार देवकर, मंडल अधिकारी व तलाठी यांनी भेट देऊन पाहणी केली व सूचना दिल्या.
जेवणाची व्यवस्था
कजगाव येथील मराठी शाळेच्या मागील भागात काही घरात पुराचे पाणी घुसल्याने काही कुटुंबांचा सारा संसार ओला झाला. कजगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल रघुनाथ महाजन यांनी या साऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली.