कजगावात अमावास्येच्या रात्री चोरट्यांनी साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:20 PM2021-05-11T22:20:28+5:302021-05-11T22:21:10+5:30

कजगाव येथील राजकुवरनगर भागातील दोन घरं व शेजारील श्री समर्थ बैठक केंद्राजवळील एक घर अशी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून चार ते साडेचार लाखाचा ऐवज लांबवला.

In Kajgaon, thieves made a move on the night of the new moon | कजगावात अमावास्येच्या रात्री चोरट्यांनी साधला डाव

कजगावात अमावास्येच्या रात्री चोरट्यांनी साधला डाव

Next
ठळक मुद्देसोने-चांदीसह रोकड मिळून चार ते साडेचार लाखांचा ऐवज लंपास; नागरिकांत घबराट

लोकमत न्यूज नेटवर्क

कजगाव, ता. भडगाव : येथील राजकुवरनगर भागातील दोन घरं व शेजारील श्री समर्थ बैठक केंद्राजवळील एक घर अशी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडत सोने-चांदी व काही रोकड मिळून चार ते साडेचार लाखाचा ऐवज लांबवला. अमावास्येच्या रात्रीच या चोरट्यांनी डाव साधला. एकाच रात्री तीन घरफोड्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे तर दुसरीकडे शोपीस म्हणून उभ्या पोलीस मदत केंद्रालाच खरी मदतीची गरज असल्याचे नागरिकांत चर्चा रंगू लागली आहे.

कजगाव-भडगाव मार्गावरील राजकुवरनगरमधील दशरथ गंगाराम पाटील यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून कानातले ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, चांदीच्या काही वस्तू व देव २०० ग्रॅम वजनाचे, पाच ते सहा हजार रुपये रोख रक्कम तसेच त्यांच्याच शेजारी राहत असलेले सुरेश महादू गढरी यांचे बंद घर फोडत येथून पंचवीस ग्रॅम वजनाच्या दोन पोत, पंधरा ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, बारा ग्रॅम वजनाच्या बांगड्या, चांदी व रोख १८ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवले. तेथून काही अंतरावर असलेल्या श्री समर्थ बैठक केंद्राजवळ रहात असलेले रेल्वे कर्मचारी हितेश संजय पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडत तेथून दोन कपाट तोडत चेन, अंगठी व पदक असे १९ ग्रॅम सोने व ५ ते ६ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लांबविला. एकाच रात्रीतून चक्क तीन ठिकाणी चोरी करत लाखोंचे सोने व रोकड चोरट्यांनी लांबवत पोलिसांना एक आव्हान दिले आहे.

तीन घरांचे कडीकोयंडे तोडण्यात आले. घरातील सर्वच ठिकाणी कपाटचे कुलूप तोडण्यात आले. या परिसरात चक्क दोन तासांपर्यंत चोरट्यांचा हैदोस सुरू होता. श्री समर्थ बैठक केंद्राजवळील हितेश पाटील यांचे घर पुढून उघडले आणि चोरीचे काम फत्ते करत मागच्या दाराने पलायन केले. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या घरफोडीत अंदाजे चार ते साडेचार लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

पोलीस मदत केंद्राला मदतीची गरज

कजगाव हे तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव आहे. भडगावप्रमाणेच महत्त्वपूर्ण असलेल्या या गावाची बाजारपेठ चाळीस ते पन्नास खेड्यांची केंद्रबिंदू बनली आहे. प्रसिद्ध सराफ बाजार तसेच रेल्वे स्टेशन या साऱ्याच बाबींचा विचार करून येथे पोलीस मदत केंद्र देण्यात आले. मात्र या मदत केंद्रालाच खरी मदतीची गरज आहे. कारण येथे कायमस्वरूपी पोलीसच नाही. याच गोष्टींचा फायदा उचलत गुन्हेगारी, चोऱ्यासारख्या घटना घडतात.

श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची भेट

घटनास्थळी श्वानास पाचारण करण्यात आले होते. मात्र माग न दाखविता ते माघारी गेले तर ठसेतज्ज्ञांनी ठशाचे नमुने घेतले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: In Kajgaon, thieves made a move on the night of the new moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.