२५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन : जळगावात एन.मुक्टोचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:04 PM2018-07-24T13:04:26+5:302018-07-24T13:04:44+5:30
विविध विषयांवर चर्चा
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (एन.मुक्टो)तर्फे खोटेनगरात सोमवारी जिल्हा मेळावा झाला. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घाईगर्दीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत टीका करण्यात आली. तसेच सप्टेंबर महिन्यात संघटनेच्या विविध ११ मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
अध्यक्षस्थानी एन.मुक्टोचे प्रा.डॉ.संजय सोनवणे होते. प्रारंभी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघावर उपाध्यक्ष व सहसचिव तसेच कार्यकारिणी सदस्य, जनरल कौन्सिलवर निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रा.बी.पी.सावखेडकर, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ.मनोहर पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहते, प्रा.डॉ.किशोर कोल्हे,डॉ.संध्या सोनवणे, विद्या परिषदसदस्य डॉ.शुभांगी राठी उपस्थित होते. प्रा.सावखेडकर यांनी सीबीसीएस बाबत विद्यापीठाकडून कशा पद्धतीने घिसडघाई चालली आहे? त्याबाबत संघटनेची भूमिका काय? याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीयभाषणात डॉ.सोनवणे यांनी उमविच्या निर्णय प्रक्रियेवर व सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणावर टीका केली. प्राध्यापकांच्या ७१ दिवसांनच्या वेतनाचा प्रश्न, रिक्तपदे, सातवा वेतन आयोग, नवीन पेन्शन योजना रद्द करणे, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न यासह ११ मागण्यांसाठी सप्टेंबर महिना हा आंदोलनाचा महिना असेल असे जाहीर केले. त्यानुसार पहिला टप्पा आंदोलन विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ६ आॅगस्ट रोजी काळ्याफिती आंदोलन, २० ते ३१ आॅगस्ट सहसंचालक/ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ४ सप्टेंबर रोजी ‘काळा दिवस व कोर्ट अॅरेस्ट, ११ सप्टेंबर रोजी एक दिवस काम बंद आंदोलन, २५ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप चव्हाण यांनी तर आभार डॉ.अजय पाटील यांनी मानले.