कानबाईचे आज आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:07+5:302021-08-15T04:19:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद : खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १५ ऑगस्ट रविवारी साजरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद : खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १५ ऑगस्ट रविवारी साजरा होत आहे. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारीच हा उत्सव साजरा होत आहे. बाहेरगावी असलेले भाऊबंद या व्रताला एकत्र येतात व हा उत्सव साजरा करतात. म्हणून या उत्सवाला ‘भावबंधनाचा महिमा’ वर्णन करणारा एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव असेही संबोधले जाते. कानबाई आणि रोट हे कौटुंबिक सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.
खान्देशात कानबाई उत्सवाला अनन्य महत्त्व आहे. कानबाई ही श्रीफळ म्हणून मानल्या जाणाऱ्या नारळाच्या रूपाने घरोघरी स्थापना केली जाते. कुलपरंपरेनुसार घरपरत्वे उत्सव साजरा केला जातो. कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य उगतभानु (सूर्यनारायण), सायंकाळी कानबाई रोट साजरे करतात.
रोटासाठी आदल्या दिवशीच गहू कुलाचाराप्रमाणे मोजून दळून घेतले जाते. या कणकेला, गव्हाच्या पिठास रोट असे म्हणतात. ईष्टदेवतांसह घरातील कुटुंबीय सदस्यांची संख्या अशी प्रत्येकाचे पाचमूठ गहू दळणासाठी घेतात. कुलाचाराप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पद्धत निरनिराळी आहे. ही रोटाची कणीक देवीच्या कुळधर्मापूर्वी अर्थात् पौर्णिमेच्या आत संपवायची असते अशी प्रथा आहे.
कानबाईचे रोट करताना सव्वाशेर, अडीच शेर, सव्वा पायली या हिशेबाने गहू घेतले जातात. काही ठिकाणी गोठ्यातील पशुधनाच्या नावाने पाच-पाच मुठींचा वरताळा घेण्यात येतो. काही ठिकाणी सूर्योदयापूर्वी सर्व स्वयंपाक तयार करतात. उगवत्या सूर्याचे पूजन करून खीर-पुरीचे जेवण सारे घेतात
कानबाईना रोट या उत्सवासाठी कुठली तारीख किंवा तिथी ठरवलेली नसते. नागपंचमीनंतर येणारा पहिला रविवार हा कानबाईच्या रोटचा दिवस असतो. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. शनिवारी कानबाईचा रोट खऱ्या अर्थाने सुरू होतो. पहिल्या दिवशी ३ पिढ्यांचे कुटुंब एकत्र येते, सोबत गहू दळले जातात. रविवारी कानबाईची विधिवत स्थापना करतात
अशी होते स्थापना
केळीचा खांबाने मखर सुशोभित करून चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा (नाणे) टाकून व सजवून त्यावर पारंपरिक नारळ ठेवून देवीचा शृंगार केला जातो. अलंकारांनी सजवून देवीला प्रिय असलेली फुले अर्पण करतात. दुपारी विधिवत स्थापना करून सायंकाळी महानैवेद्य अर्पण करतात. रोट (पोळी), गंगाफळाची भाजी विनातिखटाची, खीर, असा नैवेद्य कानबाई अर्पण केला जातो. साखर फुटाणे, लाह्या, काकडीच्या प्रसादाला महत्त्व आहे. महाआरती करून सायंकाळी भाऊबंद एकत्र प्रसाद ग्रहण करतात. रात्री झिम्मा, फुगड्या, जागरण, गीतभजनाचे कार्यक्रम होतात.
सोमवारी विसर्जन
स्थापन पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी नदीपर्यंत मिरवणुका काढून कानबाईचे विसर्जन केले जाईल.