मालमत्ता विक्रीतही कंडारेने केला ४८ कोटींचा झोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:04+5:302021-07-13T04:06:04+5:30
जळगाव : बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक केल्यानंतर तपासात रोज नवनवीन बाबी व प्रकरणे समोर येत आहेत. ...
जळगाव : बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक केल्यानंतर तपासात रोज नवनवीन बाबी व प्रकरणे समोर येत आहेत. खोट्या पावत्या व बॉण्डच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा झोल केल्याचे समोर आल्यानंतर आता आणखी या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेल्या संशयितांशी संगनमत करून पुणे व जामनेर येथील पाच मालमत्ता लिलाव प्रक्रियेद्वारे कमी किमतीत विक्री करून ४८ कोटी ५६ लाख ५२ हजार ८२० रुपयांचा अपहार केल्याचे पोलीस तपासातही उघड झाले आहे.
बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीच्या वेळी भरण्यात येणारे टेंडरबाबतची माहिती व गोपनीय कोड सॉफ्टवेअर बनविणारा कुणाल शहा (अहमदाबाद) हा कंडारे याच्याशी संगनमताने सुनील झंवर व सूरज झंवर या पितापुत्राला कळवत होता, त्यामुळे इतर लोकांनी भरलेल्या टेंडरची माहिती सुनील झंवर याला अगोदरच समजत होती. झंवर याला स्वस्तात मालमत्ता उपलब्ध होण्यासाठी कंडारे याने मालमत्तेचे कमी रकमेचे मूल्यांकन करून घेतले व त्यात कमी किमतीतच लिलाव प्रक्रिया राबविल्याचे तपासात समोर आले आहे.
आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कंडारे याने अंदाजे ६५० कर्ज खाती महावीर जैन, सुनील झंवर व सूरज झंवर यांच्या माध्यमातून एफडी मॅचिंगद्वारे निरंक केल्याचेही तपासात निष्पन्न झालेले आहे. यापैकी बऱ्याच कर्जदारांची कर्ज मागणी अर्ज फाइल्स व एफडी मॅचिंग झालेल्या फाइल्स कार्यालय झडतीत मिळून आलेल्या नव्हत्या, नंतर त्याला जळगावात आणले तेव्हा तळमजल्यात लपविलेल्या ज्या २५ फाइल्स मिळाल्या आहेत, त्यात या फाइल्स मिळून आल्याचे सांगितले जात आहे.
तीन हार्डडिस्क व काही कागदपत्रे नष्ट केल्याचा संशय
कंडारे हा सात महिने पोलिसांच्या हाती लागला नाही, त्या काळात तो दिल्ली, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांत वास्तव्याला होता. त्याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याजवळ पतसंस्थेचा बॅकअप डेटा असलेल्या तीन हार्डडिस्क, चार मोबाइल व पतसंस्थेची काही कागदपत्रे मिळून आली आहेत. ही माहिती पतसंस्थेत असणे आवश्यक होती, मात्र ती त्याच्याजवळ मिळून आली आहे. त्यामुळे आणखी हार्डडिस्क, कागदपत्रे त्याने नष्ट केल्याचा संशय पोलिसांना आहे.
या मालमत्ता विक्रीत ४८ कोटींचा अपहार
जामनेर येथील बोदवड रस्त्यावरील ॲग्रिकल्चर मॉल ( मालमत्ता क्र. २२६, २२७), पिंपरी चिंचवड येथील ५०/१/१ दुकान क्र.५, बीएचआर बेसमेंट शॉप क्र. १६, १७, १८, १८ ए कोहिनूर अरकेड, हवेली, बीएचआर, अवधूत अरकेड अंबेगाव व रानडे निवास, घोले रोड या पाच मालमत्तांची किंमत कमी दाखविण्यात आली व त्यातून ठेवी वर्ग केल्याचे दाखवून ४८ कोटी ५६ लाख ५२ हजार ८२० रुपयांचा अपहार केल्याचेही उघड झाले आहे.