बिबटय़ाच्या हल्ल्यात कंडारीचा शेतमजूर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:34 AM2017-04-15T00:34:08+5:302017-04-15T00:34:08+5:30
हाताचा लचका तोडला : पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी जात असताना घातली झडप
जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या रायपूर कंडारी शिवारातील शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या दुरसिंग कन्हैया बारेला (32, रा. कंडारी) या शेतमजुरावर बिबटय़ाने हल्ला करीत हाताचा लचका तोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वाघूर धरण परिसरातील रायपूर कंडारी शिवारात दिलीप कोल्हे यांचे शेत आहे. या शेतात दुरसिंग बारेला हे शेतमजूर व रखवालदार म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. शुक्रवारी सकाळी शेतात ते पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी पंपाजवळ गेले असता दडून बसलेल्या बिबटयाने अचानक बारेला यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या हाताचा लचका तोडल्याने ते जखमी झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल डी. आर. बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
शेतक:यांमध्ये दहशत
बिबटय़ाच्या हल्यामुळे वाघूर धरण व रायपूर कंडारी परिसरात शेती असलेल्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील अनेकवेळा या परिसरात बिबटय़ांचा संचार असल्याचे दिसून आले आहे.
थरकाप उडविणारा दुहेरी हल्ला
बारेला मोटार सुरू करायला गेले आणि समोरून थेट बिबटय़ाने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बारेला यांचा थरकाप उडाला व त्यांनी प्रतिकार केला. त्यावेळी हा बिबटय़ा माघारी परतला. मात्र क्षणार्धात पुन्हा त्याने चवताळून हल्ला केला व थेट उजव्या हाताचा लचका तोडला. या वेळी बारेला यांनी प्रतिकार करून कशी-बशी सुटका केली आणि आरडा ओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यावेळी बिबटय़ाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील बारेला यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती वैद्यकीय सूत्रांनी दिली.