वडिलांचा अत्यंविधी करून कन्हैयाने दिली परीक्षा
By admin | Published: March 7, 2017 11:43 PM2017-03-07T23:43:12+5:302017-03-07T23:43:12+5:30
कन्हैया रमेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवसाआधी वडिलांचा अंत्यविधी करून मंगळवारी दहावीचा पहिला पेपर देऊन आपल्या जिद्दीची प्रचिती दिली आहे.
जळगाव : दहावीच्या परीक्षा जवळ आल्याने ‘त्याने’ जोरदार अभ्यास सुरू केला. घरात वडील किडनीच्या आजाराने त्रस्त. त्यांचा आजार बरा होईल अशी आशा. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी वडिलांची अचानक तब्येत खालावते व वडिलांचे निधन होते. पण वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे हा ठाम विश्वास व जिद्द मनाशी बाळगत ला.ना.सार्वजनिक विद्यालयाचा विद्यार्थी कन्हैया रमेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवसाआधी वडिलांचा अंत्यविधी करून मंगळवारी दहावीचा पहिला पेपर देऊन आपल्या जिद्दीची प्रचिती दिली आहे.
इंंद्रप्रस्थ नगरमध्ये राहणाºया कन्हैया याचे वडील रमेश सूर्यवंशी हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. कन्हैयाची परीक्षा अवघ्या एका दिवसावर आली असताना वडिलांचे निधन झाल्याने दु:खात बुडाला. मात्र वडिलांनी पाहिलेले चांगल्या शिक्षणाचे स्वप्न व आईच्या जबाबदारीचे भान ठेवून, कन्हैयाने सोमवारी वडिलांचा अंत्यविधी केला. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत मराठीचा पेपर दिला. तसेच सर्व पेपर साठी तो चांगला अभ्यास करून, दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून वडिलांना श्रध्दांजली देणार असल्याचे त्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.