कर्मयोगी अण्णांचा वारसा प्रज्ञावंतांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:37 PM2018-12-17T15:37:10+5:302018-12-17T15:37:26+5:30

आज समाजात शिक्षण क्षेत्रात जी विसंगती आणि विकृती भरलेली आहे़ ती पाहून मनात एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो़ अनुदानित अभ्यासक्रम कमी करून हळूहळू विनाअनुदानित शिक्षणाचा कल सरकारद्वारा जोपासला जातोय़ चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही पध्दती मागे पडून साम्राज्यवादी, स्वसत्ताकेंद्री हुकूमशाही प्रवृत्ती बळावते आहे़ अशा अवस्थेत संभ्रम आणि द्विधावस्था असली तरी मला ठामपणे लोकशाही पध्दतीवर विश्वास आहे़ कारण या विपरित परिस्थितीत मला मानसिक आणि नैतिक मूल्याचे बळ माझ्या वडीलांच्या आध्यात्मिक वारशामुळे प्राप्त झाले़

Karmayogi Anna's heritage to the wise | कर्मयोगी अण्णांचा वारसा प्रज्ञावंतांकडे

कर्मयोगी अण्णांचा वारसा प्रज्ञावंतांकडे

Next

सागर दुबे
जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आणि मू़जे़ महाविद्यालय या शैक्षणिक संकुलाचा अध्यक्ष या नात्याने समाजात मला आज जे स्थान आहे़ त्यामागे वडील कै ़ अण्णासाहेब जी़डी़बेंडाळे यांचा वसा आणि वारसा मला लाभला़ त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो़ कै़ अण्णासाहेब यांनी या संस्थेच्या स्थापनेपासून आपले महत्वपूर्ण योगदान दिले़ १९५७ ते १९९९ पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणाने सांभाळली़ बालपणापासून त्यांनी कुटुंबावर जे शैक्षणिक-सामाजिक संस्कार घडवले ते आम्हाला शिदोरीसारखे पुरून उरणारे ठरले़ त्यांच्या संस्कारांचा वसा घेऊनच आम्हा कुटुंबीयांची जडण-घडणी झाली़
माझ्या तारूण्यात मला या शिक्षण संस्थेच्या सेवेची संधी मिळाली़ सन १९७६ साली माझे एम़एस़सी (अ‍ॅग्री) हे शिक्षण पूर्ण झाले़ मी पूर्ण वेळ शेती व्यवसाय केला परंतू, त्याबरोबरच अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्थेच्या कार्याचे धडे गिरवित होतो़ सन १९८८ मध्ये मला केसीईच्या संचालक मंडळावर रितसर नियुक्ती लाभली़ पुढे २००८ पर्यंत मी संचालकपदाचा प्रदीर्घ अनुभव घेतला़ सन २००३ ते २००८ या कार्यकाळात मला संस्थेचा खजिनदार म्हणून कार्य करता आले़ सन २००८ पासून ते आजपावेतो अध्यक्षपदी विराजमान होऊन संस्थेच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न मला पूर्ण करता आले़ संस्थेच्या कार्याचा अभ्यास, अनुभव आणि ऋषीतूल्य अण्णासाहेबांचा वसा आणि वारसा यामुळेच मला प्रागतिक वाटचाल करता आली़ केसीईची पूर्वापार चालत आलेली ‘ज्ञानप्रसारो व्रतम’ ही ब्रीद संकल्पना पुढे बदलत्या काळानुसार संस्थेची ‘एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ’ म्हणून चाललेली वाटचाल अभिमानास्पद आहे़ या संस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये इतर संस्थांपेक्षा आगळीवेगळी ठरतात़ समाजातील सर्व जातीधर्मांच्या विद्वानांची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मूल्ये जोपासणे ही परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे़ अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा वारसा आजपावेतो सांभाळला आहे़ मला ऋषीतूल्य अण्णा आणि आई यांचा समृध्द वारसा लाभला़ गीतेचा कर्मयोग, ज्ञानतपस्वी, शिक्षणयोग आणि आरोग्य क्षेत्रातील शल्यचिकित्सक, विज्ञानयोगी आणि पातंजल अष्टांगयोगी बापाचा हा समर्थ वसा आणि वारसा मला लाभला़ या मायबापांच्या पालकत्वाचा सौभाग्ययोग मला लाभला़ त्यामुळेच मी कृतार्थ होऊन परिपक्व अशा पूर्णत्वाच्या क्षणाची निवृत्ती स्वीकारण्यास सहज तयार होऊ शकतो आहे़ सामाजिक भान, लोकशाही समाजवाद आणि सर्वसमावेशक सर्वांगिण विकासाचे धोरण मला आध्यात्म, स्थितप्रज्ञता आणि निखळ कर्मसंस्कृतीमधून माझ्या पालकांमधून बाळकडू रूपाने लाभले आहे़ या संस्थेचा हा अमृतमयी वटवृक्ष आणि त्यांच्या ज्ञानशाखांचा सर्वांगिण विस्तार हे माझे ध्येयस्वप्न पूर्णत्वास जाण्याने मला जी संतृप्तता लाभली आहे़ त्यामुळेच मी निवृत्तीचा विचार स्विकारतो आहे़ आद्य शंकाराचार्य यांच्या विधानानुसार ब्रह्मं सत्यं जगत्मिथ्या या कार्य संस्कृतीतून आणि कर्मयोगातून मला उर्वरित आयुष्य पिंडी ते ब्रह्मांडी असा अनुभूतीपूर्वक प्रवासाचा कर्मयोग साधायचा आहे़ माझी ही वसा आणि वारसा जोपासण्याची शाश्वत विचारधारा निवृत्तीची नसून ही संतृप्तीची आहे़ कारण कर्मयोग्याला निवृत्ती नसते़ त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कर्म करायचे असते़ म्हणून त्याची कर्मभूमी वेगळी असले़ मी माझा समृध्द वसा-वारसा घेऊन विश्वातल्या माझ्या आवडीच्या त्या वेगळ्या क्षेत्रात कर्मयोग साधण्यासाठी, या क्षेत्रातील तथाकथित निवृत्ती घेईन असे मला नम्रपणे सांगायचे आहे़

 

Web Title: Karmayogi Anna's heritage to the wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.