‘कर्मयोगी’ पित्याची ‘ज्ञानज्योत’ सावित्रीच्या लेकींनी भडाग्नीतून ठेवली तेवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:24 PM2021-04-17T17:24:23+5:302021-04-17T17:24:41+5:30
रावेर येथे जन्मदात्री आईच्या चितेला चुलत भावासोबत सावित्रीच्या तिन्ही लेकींनी अग्नीडाग दिला.
किरण चौधरी
रावेर : शहरासह तालुक्यातील गोरगरीब व गरजू अशा ज्ञानवंत, प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कास धरून धडपडत त्यांना प्रोत्साहन देवून वा प्रेरीत करून समाजात आदर्श विद्यार्थी घडवणार्या कर्मयोगी स्व.ना. भि. वानखेडे गुरूजी यांची एका अर्थाने ‘ज्ञानज्योत’ असलेली कन्या अर्थात येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल विमलबाई सुभाष महाजन यांचे गुरुवारी नाशिक येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांना पुत्र नसल्याने त्यांच्या तीनही कन्या असलेल्या सावित्रीच्या लेकींनी पुतण्या अमोलसह भडाग्नी देत कर्मयोग्याची ज्ञानज्योत जणूकाही तेवत ठेवली आहे.
रावेर येथील सरदार जी.जी. हायस्कूलचे सेवानिवृत्त दिवंगत मुख्याध्यापक नानू भिका वानखेडे जे नानू वानखेडे गुरुजी म्हणून समाजमनात आदरयुक्त भीतीने प्रचलीत होते. शहरासह तालुक्यातील समाजातील गोरगरीब, गरजू पण हुशार, बुध्दीचतूर, ज्ञानवंत, प्रज्ञावंत व गुणवंत अशा विद्यार्थ्यांचे पैलू पाडून त्यांना उच्च शिक्षणासाठी स्वखर्चाने प्रोत्साहन देवून ज्ञानज्योत पेटवत "ज्ञानयज्ञ" तेवत ठेवण्यासाठी त्यांनी समाजात अलौकिक ज्ञानदानाचा ठसा उमटविला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एस.माळी, जळगाव येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील, दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक व तंत्र शोध महामंडळाचे संचालक डॉ.सी.टी.माळी, अमरावती विद्यापीठातील शास्त्रज्ज्ञ प्रा.डॉ.गणेश वानखेडे यासारख्या अनेक क्षेत्रातील अनेक प्रज्ञावंतांना जीवनातील सर्वोत्तम यशोशिखरावर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपसूकच शाळा व समाज घडविण्याचे ब्रीद अंगिकारत स्व.नानू वानखेडे गुरूजी यांनी समस्त माळी समाजाचे विश्वस्त म्हणून समाजाची कर्मठ सेवा बजावली. क्रांतीसूर्य म.फुले पुण्यतिथी सोहळ्यातच त्यांचे ह्रदयविकाराने त्यांचे देहावसान झाले होते.
अशा या ज्ञानयज्ञ तेवत ठेवणार्या कर्मयोगी दिवंगत नानू वानखेडे यांच्या कन्या असलेल्या तथा सरदार जी.जी. हायस्कूलचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक प्रा.एस.बी.महाजन यांच्या पत्नी विमलबाई सुभाष महाजन यांनीही येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल म्हणून सेवा बजावताना कर्मयोगी पित्याची ज्ञानज्योत तेवत ठेवली होती. बायपास सर्जरी झालेल्या विमलबाई महाजन (६८) यांची नाशिक येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना गुरुवारी प्राणज्योत मालवली.
दुसर्या दिवशी शुक्रवारी शहरातील उटखेडा रोडवरील प्रोफेसर कॉलनीतून कोरोनाच्या सावटाखाली सकाळी नऊला अहमदाबाद येथील कन्या लीना संजय पाटील, नीता रविकांत चौधरी व कविता महेश महाजन या तिघाही कन्या व नातवंडांनी पार्थिवाला खांदा लावून त्यांची अंत्ययात्रा मार्गस्थ केली. कोरोनाच्या सावटात अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत अग्निडाग पुतण्या अमोल मोहनदास महाजन यांनी द्यायचा की तीघही सावित्रीच्या लेकींनी? असे विचारांचे वादळ सुरू असताना मुंडण करून आलेला पुतण्या अमोल महाजन याच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जन्मदात्री आईला जलपान करीत व भडाग्नी दिला. एरव्ही, पदराने जन्मदात्या आईवडिलांचे पार्थिवापुढे अंत्ययात्रेतील मार्गाची झाडलोट करून व कळशीने पाण्याची ओल टाकून अखेरचा निरोप देणार्या कन्यांनी थेट वैकुंठधामात पोहचून भडाग्नी दिल्याने कर्मयोगी पित्याची सुकन्या असलेल्या ज्ञानज्योतीला सावित्रीच्या लेकींनी भडाग्नीतून अखेर ज्ञानज्योत तेवत ठेवल्याचा आदर्श समाजमनात कौतुकास्पद ठरला आहे. सावित्री शक्तिपीठाच्या अध्यक्षा अभिनेत्री वैशाली धाकुलकर व संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.