जळगावात पुण्यकाळात दर्शनासाठी कार्तिक स्वामी मंदिर गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:51 PM2018-11-23T12:51:33+5:302018-11-23T12:54:32+5:30
श्री अयप्पा स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येऊन भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. २३ रोजी संध्याकाळी पुण्यकाळी असल्याने शुक्रवारी सकाळपासूनन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
२२ रोजी मुहूर्तावर अभिषेक, पूजा विधी होऊन भाविकांनी विशेषत: महिलांनी निवृत्तीनगरातील मंदिरात गर्दी केली होती़ या वेळी ‘मुरगण हरो हरा’ अर्थात कार्तिक स्वामींचा जयघोष भाविकांनी केला. या सोबतच औद्योगिक वसाहत परिसरातील श्री विश्वनाथ मंदिर, शिवपंचायत मंदिर तसेच ओमशांती नगरातील मंदिरामध्येही विविध कार्यक्रम उत्साहात झाले.
केरळी महिला ट्रस्टतर्फे निवृत्तीनगरात स्थापन करण्यात आलेल्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये २२ रोजी सकाळी ११ वाजता कैरली पुरोहिताच्या मंत्रोच्चारात ३३ वस्तुंनी कार्तिक स्वामींचा अभिषेक करण्यात आला. या वेळी असंख्य भाविक उपस्थित होते. दुपारी १.१० वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले व महाआरती झाली. केरळात कार्तिक स्वामींना ‘मुरगण’ असे नाव असून या वेळी ‘मुरगण हरो हरा’ असा जयघोष करण्यात आला.
दर्शनाचा पुण्यकाळ
गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता कृतिका नक्षत्रास सुरुवात झाली. कार्तिक महिना, कृतिका नक्षत्र व त्यात कार्तिक स्वामींचे दर्शन हा पवित्र काळ मानला जातो. याच काळात अनेक जण अभिषेक करून घेतात व त्यामुळे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्या मुळे संध्याकाली ५.३० वाजेपासून दर्शन घेण्यात आले. २३ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा योग असल्याने या काळात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत दर्शनाकरीता गर्दी झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर, श्रीजा अशोकन, रजनी प्रदीप, श्रीजा शामलन, संधी दामोदरन, शुभा वेणुगोपाल, जानकी दामोदरन, राजी नायर, राजी शशी, तनुजा अजीत, गंगा संजीवन, जिनीया अजू, बिंदू उन्नीकृष्णन, सोफी सुनील यासह पुरुष मंडळींचेही सहकार्य मिळाले.
मोरपिसांची अनोखी श्रध्दा
कार्तिक स्वामींचे मोर हे वाहन आहे़ त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी जाताना भाविक सोबत मोराचे पीस घेवून जातात़ कार्तिक स्वामींच्या पायाला या मोरांचा स्पर्श करून ते घराच्या देव्हाऱ्यात ठेवल्यास आरोग्य व सुखसमृध्दी नांदते अशी श्रध्दा भक्तगणांची आहे. नागरिकांची ही भावना लक्षात घेऊन निवृत्तीनगरात असलेल्या मंदिराच्या परिसरात मोरपिसांची विक्री सुरू होती.
औद्योगिक वसाहतीमधील जे - ३२ परिसरातील श्री विश्वनाथ मंदिरात पूजा विधी, आरती करण्यात आली़ या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता आरती होऊन रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. तसेच २३ रोजी पहाटे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विमल राठी यांनी केले आहे़
औद्योगिक वसाहतीमध्ये ई - ८ सेक्टरमधील शिवपंचायत मंदिरातही कार्तिक स्वामी महोत्सव झाला. २२ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून अभिषेक, आरती असे विविध कार्यक्रम झाले. २३ रोजी संध्याकाळपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले आहे. दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील मंत्री, मनिषा मंत्री यांनी केले आहे़ ओमशांती नगरातील श्री शिव शंकर मंदिराच्या प्रांगणात श्री कार्तिक स्वामींचे मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले.