काश्मीर भारताचा नाराज मुलगा, त्याला समजविण्यासाठी लाठय़ा काठय़ांची गरज काय?
By admin | Published: May 6, 2017 02:13 PM2017-05-06T14:13:18+5:302017-05-06T14:13:18+5:30
काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते..
ऑनलाइन लोकमत
काश्मिरी युवकांचा सवाल : अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांचा तेथील युवकांशी संवाद
जळगाव, दि. 6 - आम्हाला स्वातंत्र्य (आझादी), सुटका वगैरे नको आहे.., पण रोजगार हवा.., काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते.. त्याची भीतीच जणू काश्मीर खो:यातील युवकांना वाटते.. सिमेवर हवे तेवढे लष्कर तैनात करा.. काश्मीर भारताचा नाराज मुलगा आहे.. त्याला समजविण्यासाठी लाठय़ा, काठय़ांची गरजच काय, असा सवाल काश्मिरातील काही युवकांनी अलीकडेच काश्मीरच्या सहलीवरुन परतलेले अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारताना केला.
अर्थातच काश्मिरातील रोजगाराचा प्रश्न सुटावा.. तेथे शांतता राहावी यासाठी युवकांमधील असंतोष दूर करणे गरजेचे आहे.. आणि हे फक्त मूळ समस्या, युवकांशी संवादानंतर आलेले मुद्दे जाणून घेतल्यानंतरच शक्य असल्याचे मत अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार हे जवळपास आठ दिवस जम्मू काश्मीरला सहलीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी काश्मिरातील पर्यटन व्यवसायात कार्यरत युवक, काही व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अपेक्षा यावर चर्चा केली.
श्रीनगर, पहेलगाम, सोनमर्ग व गुलमर्ग या भागात फिरले. तेथे जाणवलेल्या अडचणी, प्रश्न यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधला.. त्यातील काही प्रमुख मुद्दे असे..
कुठेही दगडफेक दिसली नाही
या भेटीदरम्यान आपल्याला कुठेही दगडफेकीच्या घटना दिसल्या नाहीत. पर्यटकांना तेथे कुठलाही त्रास होत नाही.
तेथील व्यावसायिक पर्यटकांशी मनमोकळेपणाने जसा संवाद साधतात तसे ते सांभाळही करतात.
फक्त एका गावात विद्याथ्र्याचा लहान मोर्चा
काश्मिरात फिरत असताना बजबिहार या गावात काही विद्याथ्र्याचा मोर्चा निघाला होता. ते कुठल्याशा समस्यांचे निवेदन द्यायला प्रशासनाकडे जात होते., पण गावात तणाव नव्हता..तशी सर्वत्र शांतता दिसली.
पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम
काश्मिरमधील श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम व इतर भागात पर्यटन हा रोजगाराचा प्रमुख भाग आहे. सफरचंद, सुकामेवा हे तेथील दुय्यम व्यवसाय आहेत. पण यातील पर्यटन व्यवसायावर अलीकडे तेथील असंतोषाच्या वातावरणाने प्रतिकूल परिणाम झाला आहे.
पर्यटनासंबंधी कार्यरत व्यावसायिक कुठल्याही पर्यटकांना फिरविण्यासह इतर बाबींमध्ये मोठी तडजोड (बार्गेनिंग) करायला तयार होतात.
कारण तेथे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.. आपल्याला ग्राहक मिळेल की नाही.., असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जे येतील त्यांना कमी अधिक दरात सेवा द्यायची भूमिका त्यांची असते.
पाकिस्तानची फूस..
भारत व काश्मीर यांच्यात धोरणात्मक बाबी, स्थलांतर, कलम 370 व इतर मुद्दय़ांवरून जो तणाव, भांडण आहे.
त्याचा लाभ मात्र पाकिस्तान घेत आहे. पाकिस्तानची तेथील असंतुष्ट मंडळींना फूस आहे. भारत व काश्मिरातील तणाव हा चर्चेनेच सोडवावा लागेल.
त्याशिवाय या स्वर्गात शांतता नांदणार नाही, असे मत अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांनी शेवटी व्यक्त केले.
पर्यटकांची पाठ
श्रीनगरमधील अनेक मोठे हॉटेल्स रिकामे दिसले. आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तेथे फक्त आमच्या व्यतिरिक्त कुठलेही पर्यटक नव्हते.
हॉटेलचा युवक मॅनेजर म्हणाला, शिकूनही फायदा नाही..
पहेलगाममधील ज्या हॉटेलात आम्ही थांबलो होतो त्याचा मॅनेजर शफीक हा एम.फील झाला होता. पण पुढे आणखी शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे याच हॉटेलात काम करणे त्याने पसंत केल्याचे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर कळले. जे हॉटेल तो सांभाळत होता त्याचे मालक जम्मूमध्ये राहत होते. पुरेशा पर्यटकांअभावी या हॉटेलचे वीजबिलही भरण्यास आपण असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. अशाने तेथील 50 टक्के युवक बेरोजगार झाल्याचे समोर आले.
कूपवाडामधील हल्ल्याच्या ठिकाणापासून 150 कि.मी. अंतरावर
मागील महिन्याच्या अखेरीस कूपवाडामध्ये जो हल्ला अतिरेक्यांनी केला.. त्या वेळेस या हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही फक्त 150 कि.मी. अंतरावर होतो. पण कुठला अडथळा आला नाही. आम्ही सहज फिरू शकलो.