वीजपुरवठ्याअभावी पाचव्या दिवशी कासोद्याचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 05:35 PM2017-11-14T17:35:00+5:302017-11-14T17:46:21+5:30
सोळा गाव प्रादेशिक पाणी योजनेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने केला वीज पुरवठा खंडीत
आॅनलाईन लोकमत
कासोदा, ता.एरंडोल,दि.१४ : सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पाचव्या दिवशीदेखील सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. सुमारे २६ लाख रुपये थकीत असल्याने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात वणवण भटकंती करावी लागत आहे.
सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शिखर समितीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह पाणीपुरवठा व वीज वितरणच्या अधिकाºयांचे उंबरठे झिजवले पण यश काही आले नाही. मंगळवारी पाच लाख रुपये वीज कंपनी कार्यालयात भरण्यात येतील, असे आश्वासन सीईओंनी दिले आहे, अशी माहिती शिखर समितीच्या वतीने देण्यात आली.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल. ग्राम पंचायतींनी वीज बिलांचे पैसे भरले पाहिजेत. कासोद्यासाठी ११ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर काढण्यात आले आहे. आता लवकरच कामाला सुरवात होणार आहे.
-उज्ज्वला पाटील, अध्यक्षा,
जिल्हा परिषद, जळगाव
पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर या योजनेतील सर्व ग्रामपंचायत मधील शेकडो महिला आंदोलन करतील. एरंडोलच्या पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
-मनीषा चौधरी, अध्यक्षा, शिखर समिती, सोळा गाव पाणी योजना.