कस्तुरबा आणि शेळीचे दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:14 PM2018-03-25T13:14:33+5:302018-03-25T13:14:33+5:30
मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा होता. गांधीजींनी सांगून ठेवले होते की ते जेवणार नाहीत. कस्तुरबाने आग्रह धरला
असे कसे? एवढा सणाचा दिवस आणि उपवास कसा बरे करता येईल? आज तर गोरगरिबांच्या घरीही आनंद असतो. काही तरी खायला हवे. तुमच्या आवडीची लापशी केली आहे. थोडी मुगाची उसळ घ्या. थोडे खा.’
कस्तुरबाच्या आग्रहामुळे गांधीजी जेवायला बसले. अन्नाला अन्नपूर्णेच्या हातची चव होती. ते पोटभर जेवले. कस्तुरबाच्या हातची लापशी. मुगाच्या उसळीला खमंग फोडणी होती. गांधीजींना गाजरे आवडायची. जेवण आटोपले. तास लोटला नाही तोच गांधीजींना त्रास सुरू झाला. तिने विश्रांतीचा आग्रह केला. गांधीजी काही मानले नाहीत. त्यांना कामांचा डोंगर उपसायचा होता. रात्री नडियादला जायचे होते. साबरमती स्टेशनवर ते पायी चालत निघाले. ते सव्वा मैलांचे अंतर होते. त्यांचे दुखणे वाढत चालले होते. अखेर आश्रमात परतावे लागले. पाण्याचे प्रयोग सुरू झाले. कस्तुरबा तर दमून गेली. आजार थांबायचे काही नाव घेईना. दूध घेणे फार गरजेचे होते. गांधीजींचा तर ठाम नकार होता. डॉक्टर दलाल विचारत होते-
‘तुम्ही दुधाचे सेवन का बरे करत नाही?’
‘गाई-म्हशींवर फुंकरीची प्रक्रिया होते. यामुळे मला दूध नकोय. तो माणसाचा आहार होऊ शकत नाही. मी दुधाचा त्याग केला आहे.’
गांधीजींचे हे उत्तर कस्तुरबाला माहीत होते. येथवर तर ते पाठही झाले होते. ती गांधीजींच्या खाटेशेजारीच तर उभी होती. ती म्हणाली,
‘हे तुमचे ठरले आहे, हे खरे आहे. अगदी असेच ठरवले असेल तर शेळीचे दूध घेता येईल.’
डॉक्टरांनी हे ऐकले. ते खूप खूश झाले. आनंदून म्हणाले,
‘मग तर माझे काम झाले. शेळीचे दूध घेतले तरी चालेल.’ गांधीजी हसले. हसत म्हणाले,
‘कस्तुर आहेच आमची डॉक्टरीण.’
गांधीजी खूश झाले. कस्तुरबा लाजली. डॉक्टर हसले. आनंदाच्या लहरी उसळल्या. (क्रमश:)
- प्रा.विश्वास पाटील