कस्तुरबांच्या जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:03 PM2018-02-23T12:03:19+5:302018-02-23T12:03:40+5:30

Kasturba Jawa | कस्तुरबांच्या जावा

कस्तुरबांच्या जावा

Next

स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे.
दोघांनी धावत-पळत राजकोट, पोरबंदर गाठले. नातलगांच्या गाठीभेटी घेतल्या. सुख-दु:खे वाटून घेतलीत. वाटून घेण्यासारखी तर दु:खेच होती. लक्ष्मीदास व करसनदास यांच्या विधवा बायकांची भेट घेतली. कस्तुरबाचे मन अपार दु:खी झाले. आपल्या जावांचा उकर्ष काळ तिने अनुभवला होता. तिला आपल्या जावांची आठवण यायची. मोठी जाऊबाई तिची खूप काळजी घ्यायच्या. गांधीजी जेव्हा विलायतेत शिकायला गेले तेव्हा त्यांचीच तर सोबत होती. त्या सुख-दु:खाच्या साथीदार होत्या. एकमेकांची एकमेकींना मदत होती. त्या जावांची छान गट्टी जमायची. हे दुर्मीळ होते.
ते सोन्याचे दिवस आता संपले होते. मुंग्यांच्या वारुळाला जणू आग लागावी तसे कस्तुरबांचे झाले. जावांच्या कपाळीचा सौभाग्यसूर्य मावळला होता. त्यांच्या गात्रावर आधीची उजळ कांती आता उरली नव्हती. त्या तिच्या गळ्यात गळा घालून मिरवलेल्या सख्या उरल्या नव्हत्या आता. कितीदा त्या एकमेकींच्या अंगावर हात टाकून पडल्या होत्या. एकमेकींशी मनीचे गुज बोलल्या होत्या. कुजबुजल्या होत्या. रुसल्या-भांडल्या-करवादल्या होत्या. पुन्हा न करमून एक झाल्या होत्या. आताच्या या सख्या नसून वृद्ध, गंभीर, प्रौढ बायका होत्या. त्यांच्या भोवताली जणू काही वयाचा कोट होता. त्यांना साद घालता येत नव्हती. कस्तुरबाचे पुढे उचललेले पाऊल मागे ओढले गेले होते. त्याच म्हणाल्या, ‘अग कस्तुर. येना, बस. उभी का अशी? केव्हा आलीस? कशी आहेस?’ तिचे यावर मौन होते. रंगीत वस्त्रांमध्ये त्यांना बघायची सवय असलेल्या कस्तुरबाला त्यांना अशा विधवा वेषात बघावे लागले. ती दमून गेली. त्यांच्या हातातील रंगीत काकणे उतरली होती. आता त्या गंगा भागीरथी झाल्या होत्या. पवित्र तर त्या होत्याच; पण आता वैधव्याने त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावले होते.
ती हतबुद्ध होऊन त्यांच्यासमोर बसली. तिला लग्नात धमाल करणाºया जावा आठवत राहिल्या. देवघरात मोठ्याने भजने गाणाºया जावा आठवत राहिल्यात. आता त्यांचा कंठस्वर एकदम मौन-मूक झाला होता. अनिवारपणे आलेला हुंदका तिला रोखता आला नाही. तिच्या मनाभोवती आठवणींचा जाळ पेटला होता.
कस्तुरबांचे जीवन अनेक अर्थाने पारिवारिक होते. कौटुंबिक होते. कुटुंब हा तिच्या चिंतनाचा मूलाधार होता. घर उभं राहावं, टिकावं आणि जगाला मार्गदर्शक व्हावं या दिशेने ती प्रयत्नशील राहिली. गांधी कुटुंबात पाऊल ठेवल्यावर तिची मोठी म्हणवणारी जाऊ खरं तर बरोबरीची होती, किंबहुना बा मोठ्याही होत्या. एक सुरम्य स्वप्न आपल्या जावांच्या सोबत कस्तुरबाने विणले होते. आज त्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. (क्रमश:)
- प्रा.डॉ. विश्वास पाटील

Web Title: Kasturba Jawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव