कथ्थक नृत्याने जळगाव फेस्टिव्हलला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:19 PM2018-09-17T15:19:49+5:302018-09-17T15:23:52+5:30
गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर जळगावात सुरू करण्यात आलेल्या जळगाव फेस्टिव्हलचे रविवारी रात्री थाटात उद््घाटन झाले.
जळगाव : गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर जळगावात सुरू करण्यात आलेल्या जळगाव फेस्टिव्हलचे रविवारी रात्री थाटात उद््घाटन झाले. सूर निरागस हो या गणेश वंदना कार्यक्रमाने या महोत्सवास सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या कथ्थक नृत्याने शहरवासीयांची मने जिंकली.
नव्यानेच सुरू झालेल्या बंदिस्त नाट्यगृहात गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या वतीने चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये रविवारी सूर निरागस हो या डॉ. मंजिरी देव दिग्दर्शित कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, मनपातील भाजपाचे गटनेते भगत बालाणी, नगरसेविका ज्योती चव्हाण, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मंजिरी देव, श्रीराम देव यांचा सत्कार करण्यात आला.
कथ्थक नृत्याने रसिक थक्क
यावेळी डॉ. मंजिरी देव यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी बहारदार कथ्थक नृत्य सादर केले. एकापाठोपाठ एक लक्षवेधी नृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली.
पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर जळगावात सुरू करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमुळे शहरवासीयांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असून एका चांगल्या उपक्रमास यानिमित्ताने सुरुवात झाल्याचे खासदार ए.टी. पाटील म्हणाले.
गणेशोत्सवातील हा एक चांगला पायंडा असल्याचाही उल्लेख खासदार पाटील यांनी केला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचेही भाषण झाले. १७ सप्टेंबर रोजी गीतशिल्प या मराठी, हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १८ रोजी स्थानिक कलावंतांच्या एकदंताय वक्रतुंडाय या स्वरवेध फाउंडेशन निर्मित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२० सप्टेंबर रोजी शुभ दंगल सावधान या विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वरलयाकृती या सूर, ताल, लय, नृत्याच्या एकत्रित आविष्काराने महोत्सवाची सांगता होणार आहे.