दोन एकर मक्याच्या शेतात चारल्या काठेवाडीच्या गायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:20+5:302021-08-14T04:21:20+5:30
आडगाव, ता. चाळीसगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटत आले, तरी दमदार पाऊस नसल्याने याशिवाय विहिरींनीही तळ ...
आडगाव, ता. चाळीसगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटत आले, तरी दमदार पाऊस नसल्याने याशिवाय विहिरींनीही तळ गाठला आहे. दोन महिन्यांचे पीक होत आल्याने त्यांची वाढ खुंटून कधी नुकसान होईल व कधी कणसे लागतील, याची शाश्वती नसल्याने हताश झालेल्या देवळी येथील प्रकाश जगन्नाथ पाटील या शेतकऱ्याने चक्क आपल्या दोन एकरवरील मक्याच्या शेतात काठेवाडीच्या गायी चारल्या. रोज पिकाकडे पाहूनच काळीज जाळण्यापेक्षा शेतकऱ्याने मोठ्या जड अंत:करणाने आपल्या शेतावर गायी चारल्या.
मन्याड परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशीबरोबर मक्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. ठिबक असलेल्या क्षेत्रावर कपाशी लावली व कोरडवाहू क्षेत्रावर सरी पाडून मका लावला. सुरुवातीला पावसाने जोरदार सलामी दिल्याने पुढेदेखील निसर्गाची चांगली मेहेरबानी राहील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचा हंगाम आटोपताच सऱ्या पाडलेल्या जागी मक्याची लागवड केली.
आता लागवड होऊन दोन महिने झाले तरी सदर पिकांवर कधीकधी तुरळक पाऊस आल्याने हे पीक कमी पावसामुळे मोडसावले. त्याची वाढ खुंटून आता कितीही पाऊस आला तरी फक्त चाराच हाती येईल, उत्पन्न काही येणार नाही म्हणून या शेतक-याने हताश मन करून आपल्या दोन एकर मक्याच्या उभ्या पिकावर गायी चारल्या.
मका लागवडीसाठी शेतक-याला आलेला खर्च
दोन एकर नांगरणी खर्च. - - - ३००० हजार रुपये.
दोन एकर रोटाव्हेटर खर्च - - - २००० हजार रुपये.
बियाणे - - - ४००० हजार रुपये.
रासायनिक खत - - - ४४०० रुपये.
निंदणी, कोळपणी - - - २५०० रुपये.
अळींसाठी कीटकनाशक - - - २००० हजार रुपये.
एकूण खर्च - १७ हजार ९०० रुपये एवढा खर्च आला
असून उत्पन्न मात्र शून्य आल्याने अशीच परिस्थिती बहुतेक शेतकऱ्यांवर ओढवल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी बघावयास मिळत आहे. शासनाने सदर
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व विमा कंपन्यांनीदेखील या शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा अंदाज घेत पीकविमा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.