‘त्या’ एका चिठ्ठीमुळे निवडणूक निकालाचे पारडे फिरले, विद्यापीठात अभ्यासमंडळ अध्यक्षपदासाठी निवडणुका
By अमित महाबळ | Published: April 10, 2023 06:01 PM2023-04-10T18:01:14+5:302023-04-10T18:02:33+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १५ अभ्यास मंडळांच्या सोमवारी बैठका पार पडल्या.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १५ अभ्यास मंडळांच्या सोमवारी बैठका झाल्या. यामध्ये तीन अभ्यासमंडळांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ. मनोजकुमार चोपडा आणि डॉ. मधुकर पाटील हे अनुक्रमे रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयाच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर उर्वरित १२ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, प्राणीशास्त्र विषयासाठी झालेल्या निवडणुकीत दोनही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये नाव आलेल्या उमेदवाराला विजयी म्हणून घोषित करण्यात आले.
एकूण २५ अभ्यासमंडळांच्या निवडणूकांचा कार्यक्रम विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केला होता. निवडून आलेल्या अध्यक्षांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. निवडणूक कक्ष प्रमुख आर. आय. पाटील, डॉ. मुनाफ शेख, फुलचंद अग्रवाल, आधार कोळी, प्रवीण चंदनकर आदी उपस्थित होते. मंगळवारी (दि.११) मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या अभ्यासमंडळांच्या बैठका होणार आहेत.
अशा निवडणुका, असे उमेदवार
- १) रसायनशास्त्र अभ्यासमंडळासाठी प्रा. दीपक दलाल (रसायनशास्त्र प्रशाळा, विद्यापीठ) आणि डॉ. गुणवंत सोनवणे (किसान महाविद्यालय, पारोळा) हे दोन उमेदवार होते. डॉ. सोनवणे यांना सहा तर प्रा. दलाल यांना चार मते प्राप्त झाल्यामुळे डॉ. सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले.
- २) प्राणीशास्त्र विषयासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. मनोजकुमार चोपडा (मू. जे. महाविद्यालय, जळगाव) व डॉ. प्रवीण महाजन (ऐनपूर महाविद्यालय, ऐनपूर) या दोन्ही उमेदवारांना समसमान चार मते मिळाली. चिठ्ठीद्वारे डॉ. चोपडा यांना विजयी घोषित करण्यात आले.
- ३) वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाच्या निवडणुकीसाठी डॉ. किशोर बोरसे (एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळे) व डॉ. मधुकर पाटील (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार) हे दोन उमेदवार उभे होते. डॉ. पाटील यांना सहा तर डॉ. बोरसे यांना दोन मते प्राप्त झाली. डॉ. पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. आचारसंहिता भंगाबाबत डॉ. बोरसे यांनी केलेली तक्रार विद्यापीठाने अमान्य केली.
उर्वरित अभ्यासमंडळांचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष पुढीलप्रमाणे
गणित : प्रा. जयप्रकाश चौधरी (मू.जे. महाविद्यालय, जळगाव), भौतिकशास्त्र : प्रा. जयदीप साळी (भौतिकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), संगणकशास्त्र : प्रा. सतीश कोल्हे (संगणकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन : प्रा. ए.एम. महाजन (भौतिकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), भूगोल : डॉ. सुरेश शेलार (गंगामाई महाविद्यालय, नगाव), फार्माकॉलॉजी : डॉ. रवींद्र पाटील (अजमेरा फार्मसी महाविद्यालय, धुळे), फार्मास्युटीक्स : डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर), फॉर्मास्युटीकल केमिस्ट्री : डॉ. राजेश चौधरी (फार्मसी महाविद्यालय, फैजपूर), बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन : डॉ. आर.आर. चव्हाण (व्यवस्थापन शास्त्र प्रशाळा विद्यापीठ), कॉमर्स ॲण्ड बिझनेस लॉ : डॉ. पवित्रा पाटील (व्यवस्थापन शास्त्र प्रशाळा विद्यापीठ), कॉम्प्युटर मॅनेजमेंट : डॉ. राहुल कुलकर्णी (बी. पी. कला व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव), अकौंटींग ॲण्ड कॉस्टींग : तदर्थ अध्यक्ष डॉ. सचिन जाधव (शिंदखेडा महाविद्यालय, शिंदखेडा).