कवितेनं दिली प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:53 AM2018-07-27T10:53:23+5:302018-07-27T10:54:06+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात नंदुरबार येथील आर्किटेक्चर तथा कवी नीरज पद्माकर देशपांडे यांनी आपल्या लेखन प्रेरणेचे उलगडलेले रहस्य...
मूळात आर्किटेक्ट आणि लिखाण हा विषय एकमेकांना फार काही पूरक नाही; म्हणजे आयुष्यभर उभ्या-आडव्या रेघोट्या मारत बसणे हा आर्किटेक्टस्चा उद्योग असा अनेकांचा ग्रह असतो. अशा प्रत्येक धारणेला काही अपवाद असतात आणि मीदेखील त्यापैकी एक व्हायचं ठरवलं, हीच माझी लेखन प्रेरणा आहे.
पा चवीत असतानापासूनच मला कविता रचण्याचा छंद जडला. कवितेचा वारसा माझी आई पद्मजा देशपांडेंकडून मिळाला. शाळेत मला प्रोत्साहन दिले ते राजेश कोळी, सीमा पाटील आणि इतर शिक्षकांनी. तसेच संदीप पाटील, नीरज भोळे आणि इतर अनेक मित्रांनी. पुढे महाविद्यालयीन काळात आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्चरविषयी अधिक जागृत करण्याचा विचार पक्का होऊ लागला. तिथूनच लिखाणाला दिशा आणि उद्दिष्ट मिळाले, त्या सुरुवातीच्या काळात दीपक कुळकर्णी, नंतर रमाकांत पाटील यांनीदेखील माझ्या लिखाणाला प्रोत्साहीत केले. दरवर्षी ‘वर्ल्ड आर्किटेक्चर डे’निमित्तच्या लेखांमधून तसेच कवितांद्वारे माझं ‘आर्किटेक्चरल अवेअरनेस कॅम्पेन’ आकार घेत आहे.
माझे वडील प्राचार्य अॅड. प.नि.देशपांडे, पत्नी जयंती आणि माझ्या सासूबाई प्रा.डॉ.चारुता गोखले यांच्या आग्रह व प्रेरणेने २०१६ मध्ये माझा पहिला काव्यसंग्रह ‘रंग नात्यांचे’ प्रसिद्ध झाला. मला फक्त माणसांनीच प्रेरित केले असे नाही; तर एका निर्जीव विटेशी झालेला माझा संवादही कविता बनून अनेकांना स्पर्शून गेला. आर्किटेक्चरविषयी लिहिणारे, बोलणारे, वाचणारे सर्वच ज्ञात-अज्ञात लोक सतत माझी लेखन प्रेरणा बनून माझी पाठराखण करत राहतील यात शंका नाही.
- नीरज पद्माकर देशपांडे, नंदुरबार