न्यायालयाचे दर्शनी प्रवेशद्वार उघडे ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:22 PM2019-05-17T22:22:34+5:302019-05-17T22:24:32+5:30
निवेदन : वकीलांची प्रबंधकांकडे मागणी
जळगाव- असभ्य वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी न्यायालयाच्या दर्शनी भागातील प्रवेशद्वार हे बंद ठेवण्यात आले. मात्र, गेट बंद असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना न्यायालय सुरू आहे की बंद हा संभ्रम निर्माण होत असून दर्शनी भागातील २ क्रमांकाचे प्रवेशद्वार पायी ये-जा करणाऱ्यांसाठी उघडे ठेवावे, अशी मागणी वकील बांधवांकडून करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी न्यायालयातील प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, असभ्य वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे न्यायालयाला तुरूंगाचे स्वरूप आलेले आहे. न्यायाचे दार हे उघडे असावे, असा आदर्श विचार व हेतू जनमानासात तसेच न्यायीक क्षेत्रामध्ये आहे. मात्र, वाहनांच्या समस्या सोडविताना पायी चालणा-या नागरिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर्शनी भागातील दोन्ही प्रवेशद्वार बंद असल्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना न्यायालय सुरू आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून दर्शनी भागातील प्रवेशद्वार क्रमांक २ हा पायी ये-जा करणा-या नागरिकांसाठी उघडा ठेवण्यात यावा, अशी मागणी न्यायालयातील काही वकीला बांधवांनी केली आहे.