सात दिवस विद्यापीठातील संपूर्ण विभाग बंद ठेवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:18+5:302021-03-25T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसाला हजाराच्यावर कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून येत आहे. विद्यापीठातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसाला हजाराच्यावर कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून येत आहे. विद्यापीठातील सुमारे पंचवीस ते तीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यू सुद्धा झाला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सात दिवस विद्यापीठातील संपूर्ण विभाग बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विद्यापीठ कार्यालय व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित आहेत. तर विद्यापीठातील कनिष्ठ अभियंता यांचा नुकताच कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठातील संपूर्ण विभाग व परिसर सात दिवस बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, जयंत सोनवणे, अरविंद गिरणारे, अरूण सपकाळे, केशव पाटील, शामकांत भादलीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव पॉझिटिव्ह
विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. हे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे. नुकतेच प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव तसेच जनसंपर्क अधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठ बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटना, युनिर्व्हसिटी अधिकारी संघटना, उमवि युनिट आदी संघटनांच्या वतीने निवेदन देऊन विद्यापीठ सात दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सात दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहे.