निसर्गासोबत दिनचर्या ठेवा, योग आपोआप घडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:31 PM2019-06-24T12:31:56+5:302019-06-24T12:34:20+5:30
सद्गुरु वेणाभारती महाराज यांचा सल्ला : निर्धार योग प्रबोधिनीतर्फे ‘सन्मान योग साधकांचा’
जळगाव : पूर्वी आपली जीवनशैली निसर्गाशी निगडीत होती, त्यामुळे कोणतेही काम करताना आपसूकच योग घडत असे. मात्र आता भौतिक सुखवस्तूंमुळे निसर्गाशी नाते तुटत चालले आहे. त्यामुळे जीममध्ये जाऊन व्यायाम, योग करण्याची वेळ आपल्यावर आली. यापेक्षा निसर्गासोबत दिनचर्या ठेवा, योग आपोआप घडेल, असा सल्ला १००८ श्री महंत तपोमूर्ती, कपिकूल सिद्धपीठम पीठाधीश्वरी सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी दिला.
जागतिक योग दिनानिमित्त रविवारी संध्याकाळी कांताई सभागृहात निर्धार योग प्रबोधनिच्यावतीने ‘सन्मान योग साधकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष स्मिता पिल्ले, खेमराज खडके उपस्थित होते. या कार्यक्रमात जे योग साधक आणि योग शिक्षक अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने योग सेवा देत आहे, अशा साधकांचा गौरव करण्यात आला.
शंखनाद, त्रिवार ओंकार, गुरुवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रबोधनीचे सचिव कृणाल महाजन यांनी केले.
शेवटी ‘कावळा’ लागतो
आज योगापासून लांब गेलो आहे. सोबतच कामाच्या तणावात आपल्या समोर चिमणी, पोपट आला तरी त्यांची चिवचिवाट, आवाज नकोसा वाटतो. याच धकाधकीत आपण जीवन नष्ट करून बसतो व शेवटी चिमणी, पोपट नव्हे तर ‘कावळ््या’ची (पितृपक्षात) गरज भासते, असे सद्गुरूंनी सांगताच त्याला दाद मिळाली. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर स्मिता पिल्ले यांनी आभार मानले. भूमिका कानडे यांनी पसायदान म्हटले.
यांचा झाला सत्कार
-योग जीवनगौरव पुरस्कार - गणपत रत्नपारखी, नारायणदास जाखेटे, इंद्रराव पाटील, निलांबरी जावळे.
-उत्कृष्ट योग साधक पुरस्कार - योगाच्या सहाय्याने कर्करोगावर मात करणारे अमळनेर येथील बळीराम सखाराम कुंभार, योग साधनेच्या बळावर पक्षाघात सारख्या आजारवर मात करून स्वत:च्या पायावर उभे राहणारे हर्ष नटवरलाल चौबे, मणक्यात झालेल्या गॅपवर योगाच्या माध्यमातून मात आणि स्वत: योगशिक्षिका म्हणून सेवा देणाऱ्या दीपा कोल्हे, तीन वर्षांपासून असलेल्या स्पायनल व्हेन्सचा आजारावर योगसाधना करून आजार दूर करणारे जगन्नाथ धर्मा जाधव, छातीच्या कर्करोगावर मात करणाºया प्रतिभा कोकंदे, अरूणा पाटील, कमी वयात मधुमेहसारख्या आजारावर योग साधनेतून मात करणारे देवेंद्र अरूण काळे.
-उत्कृष्ट योग शिक्षक पुरस्कार - शंकरराव झोपे, रवींद्र मधुकर माळी, डॉ. चंदर रतनमल मंगलानी, सुनील गुरव, प्रा. अविनाश एस. कुमावत.
- निवड समिती सदस्य - प्रा. आरती गोरे, हेमांगिनी सोनवणे, डॉ. भावना चौधरी, चित्रा महाजन.