तान्हुल्यांना घरी ठेऊन ‘ती’ रात्रभर वाळूमाफियांशी झुंजली; हल्लेखोरांच्या गावात भिडल्या तहसीलदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:10 AM2023-10-02T08:10:19+5:302023-10-02T08:10:29+5:30
गस्तीवर असणाऱ्या नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची बातमी कळाली.
जळगाव : गस्तीवर असणाऱ्या नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची बातमी कळाली. एकीकडे गणेशोत्सव, ईदचा बंदोबस्त आटोपून निवांत झालेल्या पोलिसांकडेही पुरेसी कुमक उपलब्ध नव्हती. म्हणून महिला तहसीलदारांनी कुशीत झोपवलेल्या लेकरांना दूर सारलं नि मध्यरात्री सरळ पोलीस स्टेशन गाठले.
दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्याच वाहनातून त्या खेडी गावात गेल्या. भरचौकात पोलीस पाटील, कोतवालांवर कारवाईचे अस्त्र उगारले. तेव्हा आरोपींनीही नांग्या टाकल्या. आणि पहाटेपर्यंत ५ वाहनांसह चौघांना कारवाईच्या दारात उभे केल्याचा प्रकार रविवारी पहाटे एरंडोल तालुक्यात घडला. तहसीलदार सुचिता चव्हाण यांची ही ‘सिंघम’गिरी.
शनिवारी रात्री नायब तहसीलदार किशोर माळी यांच्या पथकाने वाळूतस्करीचे ट्रॅक्टर पकडले. आरोपींना आणत असताना समाधान सोनवणेसह आठ-दहा सहकाऱ्यांनी महसुलच्या पथकाला रोखले. धक्काबुक्कीसह शिवीगाळ करीत ट्रॅक्टरही पळवून नेले. रात्री पावणे दोन वाजता घडल्या प्रकाराची माहिती तहसीलदार चव्हाण यांना कळाली. त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस पाटील, कोतवाल आरोपींची घरे दाखवायला निघत असतानाच सर्वच आरोपी तहसीलदारांसमोर हजर होत गेले.
...आणि भरला दम
कुमक कमी असल्याचे पाहून त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतले आणि थेट खेडी गाव गाठले. तिथे गेल्यावर पोलीस पाटील, कोतवालांना पाचारण केले. ‘आरोपीसह मुद्देमाल द्या अन्यथा तुमच्यावरही कारवाई होईल, असा दमच भरला. घडल्याप्रकाराविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी ‘काळजी घ्या’ म्हणत कारवाईला बुस्टर दिले.