कासोदा येथे पाण्याअभावी शालेय पोषण आहार शिजलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:42 PM2019-03-06T23:42:57+5:302019-03-06T23:43:13+5:30

धक्कादायक प्रकार

Kesoda does not have any nutritional supplement due to lack of water | कासोदा येथे पाण्याअभावी शालेय पोषण आहार शिजलाच नाही

कासोदा येथे पाण्याअभावी शालेय पोषण आहार शिजलाच नाही

Next

कासोदा, ता.एरंडोल : येथील साधना माध्यमिक विद्यालयात बुधवार, ६ रोजी पाणी उपलब्ध न झाल्याने शालेय पोषण आहाराची खिचडी शिजू शकली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याुमळे सुमारे चारशेच्यावर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहिले. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पालक वर्गातून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, असे संकेत वरिष्ठांनी दिले आहे.
येथील नावाजलेल्या साधना माध्यमिक विद्यालयात दररोज सुमारे चारशेच्यावर विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी येथे खिचडी शिजविली जाते. मात्र ६ रोजी येथे खिचडी शिजलीच नाही. येथे असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नसल्याने खिचडी शिजविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे शाळेत इतरत्र कोठून पाणी आणून पोषण आहार तयार करण्याची तसदीदेखील घेतली गेली नाही व विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले. पाण्याअभावीच पोषण आहार शिजू शकला नाही, असे खुद्द शाळेच्या प्राचार्यांनी मान्य केले.
जेवणानंतर पाणी नसते
जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी येथे पाणीदेखील नसते, अशी माहिती मिळालीे. शाळेत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे ती कोरडीच असल्याचे आढळून आले. एरव्ही नेहमी येथे पाणी टँकरद्वारे येते का, ते पाणी पिण्या योग्य असते का, टाकी नेहमी स्वच्छ केली जाते का, पाणी कुठून आणले जाते, याबाबत आता या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न येथे गंभीर आहे. वरीष्ठ अधिकारी व संस्था चालकांनी या विद्यालयाकडे लक्ष देऊन विद्यालयची गुणवत्ता व नावलौकीक पूर्वी सारखाच मिळवून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती वरीष्ठांना कळविण्यात न आल्याने हा प्रकार नेहमीच होत असावा, खोटी बिलं टाकून अनुदान लाटण्यात येत असावे, अशा अनेक चर्चा आज गावात सुरु होत्या. वरिष्ठांनी या प्रकाराची कसून चौकशी करावी, असा प्रकार या आधी सुद्धा झाला काय, याबाबत शोध घ्यावा, अशी मागणी पालक वगार्तून होत आहे.
येथील साधना विद्यालय येथील एक प्रतिष्ठित विद्यालय म्हणून ओळखले जाते. मात्र विद्यालयाच्या शैक्षणिक व इतर कामकाजामुळे जनतेतून या विद्यालयाबाबतचे आकर्षण पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याचा परिणाम पटसंख्येवरदेखील होऊ लागला आहे. सध्या प्राचार्य अमळनेर येथून ये-जा करतात, त्यामुळे शाळेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

पाण्याची व्यवस्था न झाल्याने खिचडी शिजवण्यात आली नाही. यापुढे काळजी घेतली जाईल.
- एम.ए. पाटील, प्राचार्य, साधना विद्यालय, कासोदा

कासोदा येथे झालेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होईल. दोषी आढळल्यास गुन्हेदेखील दाखल होतील. कारण विद्यालयाकडून याबाबत तालुकास्तरावर कोणतीही माहिती कळवण्यात आलेली नाही.
-विश्वास पाटील, अधीक्षक, शालेय पोषण आहार, पं.स.एरंडोल

Web Title: Kesoda does not have any nutritional supplement due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव