शहापूर येथे खळ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 03:36 PM2019-05-16T15:36:59+5:302019-05-16T15:37:36+5:30
११०० पेंड्या चारा जळून खाक : ग्रामस्थांमुळे आगीवर नियंत्रण
कळमसरे, ता.अमळनेर : तालुक्यातील पांझरा नदी काठावरील शहापूर येथे गावाबाहेर धनराज विठ्ठल पाटील यांच्या खळ्याला मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गुरांसाठी साठविलेला ११०० पेंड्या चारा जळून खाक झाला.
गव्हाचे कुट, ज्वारी, बाजरी,दादरसह सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा चारा जळून खाक झाला.
गावात पिण्यासाठी भरून ठेवलेले पाण्याचे टँकर व शेजारील भिलाली गावाने पाठविलेल्या टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे खळ्यास लागून असलेल्या आदिवासींच्या झोपड्या यात थोडक्यात बचावल्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी तत्काळ दखल घेत मारवड येथील मंडळ अधिकारी शिंदे व शहापूर तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पाठविले. आगीत सर्व चारा जळाल्याने बैलजोडी गायीसह ४-५ जनावरावर चाऱ्या अभावी संकट निर्माण झाले आहे.