चाळीसगाव शहराजवळील खडकी बुद्रुक येथे आगीत झोपडी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 07:14 PM2018-03-28T19:14:53+5:302018-03-28T19:14:53+5:30
घर बांधकामासाठी जमविलेली एक लाखांची रक्कम खाक
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.२८ : चाळीसगाव शहरापासून पश्चिमेला अवघ्या चार किमी अंतरावर असणा-या खडकी बुद्रुक गावात मजुरी करणा-या ग्रामस्थाची झोपडी आगीत जळून खाक झाली. घर बांधकामासाठी जमवलेल्या एक लाख रुपयांची देखील आगीत राख झाली. ही घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली.
खडकी बुदु्रक येथे पाण्याच्या टाकी जवळ सिद्धार्थ सोमा चव्हाण यांचे झोपडीवजा घर असून ते बांधकामावर मजुर काम करतात. दुपारी साडे बारा वाजता त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने सर्व संसारपयोगी वस्तू, धान्य, कपडे यांची आगीत राख झाली. आग लागल्याचे समजातच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
दुपारी पाऊण वाजता चाळीसगाव पालिकेच्या अग्निशमन केंद्राला कळविण्यात आले. यानंतर एक बंब पाणी टाकून आग आटोक्यात आली.
चव्हाण यांना घराचे बांधकाम करावयाचे होते. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ते पैसे जमवित होते. आगीत एक लाख रुपयांच्या नोटांचीही राख झाली आहे. दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.