खडसे आमच्याच कडेच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:40 PM2019-01-18T12:40:49+5:302019-01-18T12:43:58+5:30
खडसेंची भूमिका ही ‘वेट अॅण्ड वॉच’
चंद्रशेखर जोशी
नेत्यांमध्ये ‘मासलिडर’ असलेल्यांची संख्या कमी असते. काही जण कतृत्वापेक्षा पुर्वजांच्या पुण्याईने राजकारणात येतात तर काही जण लोकसंग्रह करत करत, नागरिकांशी समरस होत, त्यांच्या भावना समजावून घेत पुढे येतात. म्हणजेच स्वकतृत्वाने ते घडतात व हळू हळू आपला लौकीक वाढवितात. त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे आवती भोवती कार्यकर्त्यांचे वर्तुळ तयार होते. जळगाव जिल्ह्यात अशाच काही नेत्यांपैकी एक म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे होत. जिल्ह्याच्या भाजपाला वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कोणीही नाकारणार नाही. कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढविला. मात्र दोन वर्षातील त्यांची परिस्थिती पक्षाने काय केली हे सर्वच जाणतात. आता त्यात फारसे वेगळे सांगण्याची येथे गरज नाही असे वाटते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या बैठकीनंतर पुन्हा खडसेंचे नाव चर्चेत आले. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा या मतदार संघांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. कॉँग्रेसमधील नेते या दोन्ही जागांवर हक्क सांगत आहेत. तर राष्टÑवादी कॉँग्रेसमधील स्थानिक व राज्य पातळीवरील नेते मंडळीही असाच दावा करत आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेसने निवडणुकीची तयारी करत काही नावे चर्चेत आणली आहेत. यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव चर्चेत आणले आहे. तर रावेरसाठी एक-दोन नावे चर्चेत आहेत मात्र या मतदार संघातून राष्टÑवादीकडून खडसेंनी जागा मागितल्यास त्यांना किंवा त्यांच्या स्रुषा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना सधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अगदी हीच भूमिका कॉँग्रेसने देखील ठेवली असल्याचे सांगण्यात येते. पक्षातील एका नेता खडसे यांच्या संपर्कात गेल्या काही दिवसांपासून असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्ष खडसेंची प्रतिक्षा करत असल्याचेच यावरून लक्षात येते. सद्य स्थिती लक्षात घेता खडसेंची भूमिका ही ‘वेट अॅण्ड वॉच’ अशीच असल्याचे लक्षात येते. यात भाजपाची भूमिका महत्वाची आहे. हा पक्ष निवडणुकीच्या पूर्ण तयारीत आहे मात्र उमेदवारीबाबत अद्याप ‘झाकली मुठ’ असाच प्रकार आहेत. मात्र सद्य स्थितीत कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून खडसे आमच्याकडेच अशीची दबकत चर्चा सुरू ठेवण्यात आली आहे.