खडसेंचा मला ड्रगमाफिया ठरविण्याचा डाव होता, महाजन यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:01 AM2022-07-25T11:01:43+5:302022-07-25T11:02:07+5:30
ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात चर्चेच्या रेकॉर्डिंगचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याविषयी महाजन ‘लोकमत’शी बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माझ्या वाहनामध्ये ड्रग, हत्यार ठेवून मला ड्रगमाफिया ठरविण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. मात्र, ते सर्व अयशस्वी ठरले. यात मला अडकवण्यासाठी आमदार एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे वारंवार फोन करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ‘खडसे यांनी वारंवार फोन करून मला वेडे केले आहे’, असे देशमुख आपल्याला सांगत होते, असा दावादेखील महाजन यांनी केला आहे.
ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात चर्चेच्या रेकॉर्डिंगचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याविषयी महाजन ‘लोकमत’शी बोलत होते.
मला अडकविण्यासाठी खिशात घेऊन फिरायचे ड्रग
माझ्या वाहनात ड्रग टाकण्याचे ठरले होते. यासाठी पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे, असा आरोपदेखील गिरीश महाजन यांनी केला आहे. यात मी अडकलो पाहिजे म्हणून एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना वारंवार फोन करायचे, असे खुद्द अनिल देशमुख यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांनी जो आरोप केला, त्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तपासात जे काही असेल, ते स्पष्ट होईलच. तसेच या विषयी काय निर्णय होतो, ते सर्वांसमोर येईल.
- एकनाथ खडसे, माजी मंत्री.