जिल्हा बँकेत खडसे-महाजन यांच्यात होणार वर्चस्वाची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:01+5:302021-02-16T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, पॅनलसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला वेग आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, पॅनलसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील बदललेल्या राजकारणाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहेत. जिल्ह्यातील परस्परांचे विरोधक माजी मंत्री एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांसमोर येणार असून, दोन्हीही नेत्यांच्या भोवती जिल्हा बँकेची आगामी निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक एप्रिल ते जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच पॅनल तयार होणार आहेत. त्यादृष्टीने चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्यातच राज्यात झालेल्या सत्ता बदलाचा परिणाम देखील या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळेसच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याभोवती सर्व राजकारण फिरत होते. मात्र, खडसे आता भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. तसेच महाजनांचा होल्ड गेल्या निवडणुकीच्या वेळेपेक्षा जिल्ह्यात वाढला आहे. शिवसेनेची ताकददेखील वाढली असून, विधानसभेच्या जागांचे गणित पाहिल्यास जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे आहेत.
दोन्ही नेत्यांच्या पॅनलमध्ये विभागले जातील सर्वपक्षीय उमेदवार
सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसते, त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचे मिळूनच पॅनल तयार होत असते. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वांचा आग्रह असला तरी महाजन-खडसे एकत्र येणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत महाजन व खडसे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पॅनलमध्येच सर्वपक्षीय उमेदवारांची मोट बांधून दोन्ही नेत्यांचे पॅनल एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आठवडाभरात शिवसेनेची भूमिका होणार जाहीर
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या नियोजनासाठी शिवसेनेची येत्या दोन दिवसात बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बैठकीनंतरच शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पक्षाकडून येणाऱ्या आदेशावर देखील भुमिका निश्चित केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सध्यस्थितीत शिवसेनेचे ४ सदस्य जिल्हा बँकेत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जास्त जागांची मागणी होवू शकते.
महाविकाससाठीही प्रयत्न सुरु
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने हाच पॅटर्न जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राबविण्यासाठी काही जण आग्रही आहेत. मात्र, खडसेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीतील सदस्य दुखावले गेले आहेत. तर शिवसेनेतही काही जण खडसेंशी जवळ आहेत. तर काही जण त्यांच्या विरोधी, अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा पॅटर्न कितपत यशस्वी होतो यावर आगामी रणनिती ठरणार आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सर्वपक्षीय आघाडीलाचा प्राधन्य असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याआघाडीचे नेतृत्व खडसे करतील की महाजन याबाबत वाच्यता केलेली नाही. तसेच महाजनांनीही जिल्हा बँकेसाठी तयारी केली असून, काही इच्छुकांनी भेट घेतल्याचीही माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. तर खडसे पुन्हा सक्रिय झाल्याने त्यांच्याकडे इच्छुकांचा भेटी वाढल्या आहेत.