ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:49+5:302021-01-22T04:15:49+5:30
जळगाव : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात ...
जळगाव : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सोमवार २५ जानेवारीपर्यंत कठोर कारवाई केली जाणार नाही, असे ईडीने न्यायालयात सांगितले. यावर पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, खडसे तपासात सहकार्य करीत असतील आणि चौकशीच्या समन्सचे पालन करीत असतील तर त्यांना अंतरिम दिलासा का देऊ नये? त्यांना काही दिवसांसाठी संरक्षण दिले तर आभाळ कोसळणार आहे काय? असा सवाल न्या. संभाजी शिंदे यांच्या खंडपीठाने विचारला.
खडसे यांची अलीकडेच ईडीने चौकशी केली होती. यानंतर ईडीने आपले प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले. त्यानुसार खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. खडसेंच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. याबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर, या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारीला होणार आहे. खडसे यांनी आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी या याचिकेत आहे. शिवाय तपासात सहकार्य करत असल्याने कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे. दरम्यान, याबाबत खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.