खडसे समर्थकांचा आम्हाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:55+5:302021-04-20T04:16:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून महाविकास आघाडीच्या अर्थात सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून महाविकास आघाडीच्या अर्थात सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. मात्र, आमच्या सोबत एकनाथ खडसे समर्थकांनीही सभा सोडल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या सभेपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या काही महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. त्या आधीच या ठिकाणच्या तीन पक्षाच्या गटनेत्यांनी नुकतीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली हेाती. त्यानंतर या ठिकाणच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. शिवाय चर्चांनाही सुरुवात झाली होती. त्यातच आता अधिकाऱ्यांच्या कारवाईवरून सत्ताधारी व विरोधक आमने सामने आले आहेत. सोमवारच्या सर्वसाधारण सभेत ५५ जण उपस्थित होते. त्यात ३० अधिकारीच होते तर काही सभापती होते. त्यामुळे अगदी कमी सदस्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी सभा रेटून नेल्याचे तसेच आठ ते दहा सदस्य आमच्या सोबतच सभेतून लेफ्ट झाल्याचा दावा विरोधकांनी पत्रकार परिषदेत केला.
अनेक भ्रष्टाचार बाहेर निघतील
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अनेक भ्रष्टाचार आता समोर येऊ लागले आहेत. त्यात जामनेर येथील व्यापारी संकुलाचा विषय गंभीर असून आरोग्य विभागाच्या कोविडच्या निधीचा विषय असे अनेक विषय आम्ही या सभेत मांडणार होतो. लवकरच ते विषय आम्ही मांडू, अशी माहिती राष्ट्रवादीचे सदस्य रवींद्र पाटील यांनी दिली.