‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून? हे तपासण्याची गरज’; महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:11 AM2022-11-23T07:11:45+5:302022-11-23T07:13:06+5:30
महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे.
जळगाव: आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ‘सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, नाही तर त्यालाही राजकारणात आणलं असतं,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याचा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. ‘अशाप्रकारे कुटुंबीयांवर बोलणे चुकीचे आहे. खडसेंनी हे विसरू नये की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं, याचे उत्तर द्यावे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज आहे,’ असे सांगत महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा सुरू आहेत. दूध संघातील भानगडीच्या चौकशीमध्ये सबळ पुरावे हाती लागू लागले आहेत. म्हणून खडसे अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
गिरीश महाजनांना सत्तेचा माज आला : खडसे
- माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत अशा प्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा असल्याचे उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
- माझ्या मुलाबद्दल वक्तव्य करून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत. त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी करावी.
- मात्र, अशा प्रकारे कोणाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करायला नको. गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असून, त्यातून ते काहीही बरळत असल्याचे खडसे यांनी सांगितले.