खडसेंचे सूचक उद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 08:02 PM2018-12-29T20:02:56+5:302018-12-29T20:03:17+5:30
पक्षाची भूमिका याबाबत सतत चर्चा
चंद्रशेखर जोशी
जळगाव : भाजपातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याबाबतीत पक्षाची भूमिका याबाबत सतत चर्चा सुरू असतात. विशेष म्हणजे शांत बसण्याची किंवा ऐकून घेण्याची मानसिकता नसल्याने खडसे हे स्वत: नेहमी काही ना काही स्टेटमेंट करत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणाले होते कोणताही नेता एका पार्टीत कायम स्वरूपी रहात नाही. ती पार्टी त्या नेत्यासाठी कायम कधीच नसते. त्यामुळे पुन्हा एकदा तर्क वितर्क लढविणे सुरू झाले आहे.
पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमिन खरेदी प्रकरणारून खडसे अडचणीत आले. त्या पाठोपाठ त्यांच्यावर एका पाठोपाठ एक आरोप सुरू झाले. त्यात दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संभाषणापासून तर अन्य काही आरोप त्यांच्यावर झाले. राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपात मुख्यमंत्र्यांनंतरचे दोन नंबरचे मंत्री कोण तर एकनाथराव खडसे असेच त्यावेळी सांगितले जात होते. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र पक्षांतर्गत वादातून त्यांना घेरले गेले व नंतर त्यांचा राजीनाम्यापासून मागे लागलेले विषय सर्वश्रृत आहेत. राजीनामा देण्यापूर्वी व नंतर खडसेंनी विविध ठिकाणी केलेले स्टेटमेंट फारच गाजले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व त्यांच्यातील वाद कोर्टात पोहोचले. अजूनही दोघांना कोर्टाच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. दमानिया खडसेंवर आरोप करत असतात खडसे त्याला उत्तर देत असतात. त्यातच गेल्या वर्ष दोन वर्षात खडसे यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोध वाढतो आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी खडसेंबाबत निर्वाळा दिला. ते निर्दोष असल्याचे वैयक्तीक प्रमाणपत्र दिले गेले मात्र नंतरची कोणतीही कृती पक्ष पातळीवर झाली नाही. एवढेच नव्हे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वादाने आता रौद्ररूप धारण केले आहे. त्यावरही पक्षात कोणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे खडसेंचे उद्गार चर्चेचा विषय ठरले आहे. कोणताही नेता एका पार्टीत कायम रहात नाही...याचा अर्थ लावला गेला तो म्हणजे ते पक्ष सोडणार असाच लावला जात आहे. आगामी काळात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाला खडसेंबाबत निश्चित असा विचार करावाच लागणार आहे. मात्र पक्षाची नेमकी काय भूमिका असेल हे येता काळच ठरवेल...