पूरग्रस्तांच्या मदतीला धावली खाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:53+5:302021-09-02T04:33:53+5:30
जळगाव : चाळीसगाव येथे तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे व त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. प्रशासकीय व विविध ...
जळगाव : चाळीसगाव येथे तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे व त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. प्रशासकीय व विविध संस्था, यंत्रणा मदतीसाठी धावल्या असून, पोलीस दलानेदेखील ड्युटीच्या पलीकडे जाऊन समाजहिताचे कार्य हाती घेतले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तेथील परिस्थिती पाहून मदतीसाठी पुढाकार घेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीबाबत सूचना केल्या. जळगाव उपविभागाकडून मंगळवारी सायंकाळी पाच टन साहित्य घेऊन पोलीस वाहन रवाना करण्यात आले. त्यात पाण्याची १०० खोकी, १५० ब्लँकेट, ५०० चटया, चिवड्याची १४० पाकिटे, चिक्की २००, मास्क १००, मॅट २००, साड्या ५५, साडे चार हजार बिस्कीट पुडे यासह जेवणाची १ हजार पाकिटे यांचा समावेश आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी हे साहित्य असलेला ट्रक रवाना केला. जिल्हा पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी या तीन पोलीस ठाण्यांच्या वतीने ही मदत पाठविण्यात आली.