‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:42 PM2023-04-19T17:42:11+5:302023-04-19T17:51:22+5:30
रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली
कुंदन पाटील
जळगाव : घराला दारिद्र्याचा उंबरठा.मायबापाचं पोटही हातावर. म्हणून काम करुन शिकत जायचं, हा प्रवासच होता पाचवीला पूजलेला. म्हणून दहावीही झाली. गुणवत्ता होतीच पाठिशी. तंत्रनिकेतनला दिवसभर कॉलेजला जावं लागेल म्हणून प्रवेश टाळला आणि मु.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली आणि कालांतराने अख्खी ‘खाकी’च प्रेमात पडली. तेव्हा शिवणकलेच्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा...निखळ, नितळ आणि निर्मळपणे फडकणारा...नात्यातला जिव्हाळा जपणारा...
शंकर आसाराम माळी (वय ६९) असे या सुखकर धाग्याचे नाव. बालपणी दारिद्री असताना शिवणकाम करणाऱ्या शेजाऱ्याने हात दिला आणि कालांतराने कधीतरी मजुरीत भिजणाऱ्या हातांना शिवणकला पावली.१९६८ मध्ये शंकरराव शिवणकलेसाठी पाय कसरत करत गेले. दोघा-तिघा पोलिसांनी ‘खाकी’ शिवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनाही ‘शंकर’ पावले.१९८७ नंतर जिल्ह्यात येणारा प्रत्येक पोलीस अधीक्षकही शंकररावांना ‘वर्दी’ शिवण्यासाठी बोलावत गेले. टी.एस.भाल यांच्यापासूनचा हा प्रवास डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत कायम राहिला. या सर्वच अधिकाऱ्यांशी अतूटच्या धाग्याने जिव्हाळ्याचे नाते विणले आणि तो प्रवास कायम ठेवला.
भालच म्हटले, हे कोण?
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील ‘आयपीएस’ मेसवर एकदा शंकररावांना बोलावलं गेलं. निमित्त होतं टी.एस.भाल यांची ‘वर्दी’ शिवण्याचे. माप घेण्यासाठी शंकरराव मेसवर पोहोचले. मात्र भाल यांच्यासोबत शहरातील बडा व्यक्ती बसल्याकारणाने शंकररावांना रोखले गेले. बैठक आटोपल्यावर भाल बाहेर आले आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या शंकररावांना बघितले. ‘हे कोण’ असा प्रश्न सुरक्षारक्षकांना विचारला. तेव्हा ते तुमचे माप घेण्यासाठी आलेत म्हणून सांगितले गेले. तेव्हा भाल चिडले. ‘लोकं तर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मला इथं भेटायला येतात. शंकररावा तर माझ्या कामासाठी आले आहेत. त्यांना तुम्ही रोखले कसे, असा प्रश्न करुन त्यांनी संताप व्यक्त केला.
पटनायक म्हणायचे, मुलांना मापात ठेवा
अरुप पटनायकांच्या ‘वर्दी’चे माप घ्यायला गेल्यावर शंकररावही त्यांच्याशी जुळले होते.पटनायक त्यांना नेहमीच सांगायचे. मुलांना नीट शिकवा आणि त्यांच्या लग्नासाठी घाई करु नका. त्यांना करियर करु द्या, असा सल्ला नेहमी देत. आजही बिपीनकुमार सिंह, नवल बजाज, भूषणकुमार उपाध्याय, प्रविण साळुंखे, एस.जयकुमार, प्रकाश मुत्याळ, इशू सिंधू, मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक जळगावहून बदलून गेलेले भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी शंकररावांच्या संपर्कात आहेत. कारण त्यांनी धागाच गुंफला आहे स्नेहभावाना.