नशिराबादला खंडेराव महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:46+5:302021-04-27T04:16:46+5:30
नशिराबाद: यंदा कोरोना रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवातील २८ ...
नशिराबाद: यंदा कोरोना रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवातील २८ एप्रिल रोजी चैत्र वद्य पाडव्याला होणाऱ्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम व इतर सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने पूजन करून उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व प्रकारचे यात्रा महोत्सव रद्द केले आहेत. त्यामुळे येथील यात्रा महोत्सवसुद्धा बारागाड्या न ओढता साध्या पद्धतीने पूजा करून यात्रा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय उत्सव समिती बैठक मध्ये एकमताने घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा झाली. यावेळी भगत सुदाम धोबी, योगेश पाटील, ज्ञानदेव लोखंडे, किशोर पाटील, मोहन येवले, प्रकाश बोंडे, किरण पाटील, किरण तळले, युवराज धोबी, सुदाम कोळी, सुकलाल भोई आदी उपस्थित होते.
सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात; मात्र यंदा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व शासनाच्या आदेशामुळे खंडेराव महाराजांचा यात्रोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यानिमित्त बारागाड्या ओढणे व इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला असल्याची माहिती खंडेराव महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील व भगत सुधाकर धोबी यांनी लोकमतला दिली.
येथील धोबी घराण्याकडे गेल्या सहा पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळलेली आहे. त्यादिवशी २८ एप्रिल रोजी सकाळी मंदिरामध्ये श्रींची पूजा अभिषेक साधेपणाने करण्यात येईल. देशावर आलेले कोरोना संकट तत्काळ निवारण व्हावे, असे साकडे घालण्यात येईल व सायंकाळी होणारे बारागाड्याचा कार्यक्रम रद्द असल्याचे भगत सुधाकर धोबी यांनी सांगितले.