पारोळा येथे खंडेराव महाराजांची यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 04:44 PM2020-02-09T16:44:46+5:302020-02-09T16:46:06+5:30
खंडेराव महाराज मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
पारोळा, जि.जळगाव : डी.डी.नगर भागातील पुरातन खंडेराव महाराज मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
पालखीत खंडेराव महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती ठेवून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नाम गजरात हा पालखी सोहळा पार पडला. राम मंदिर चौकातून सुधाकर चौधरी, लोटन चौधरी यांच्या घरून गावातून थेट डी.डी.नगर भागात पालखी मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली.
सकाळी ९ वाजता निघालेली खंडेराव महाराज यांची पालखी दुपारी १ वाजता मंदिरात पोहोचली. या ठिकाणी तळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नामागजरात उठविण्यात आली. परिसरातील भाविकांनी महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. वरण, भात, भट्टी, गुळाचा शिरा असा मेनू या महाप्रसाद होता. सुधाकर व लोटन चौधरी यांनी महाप्रसादाचे नियोजन केले. यंदा ग्रामविस्तार अधिकारी डी.बी.पाटील यांची मनोकामना खंडेराव महाराज यांनी पूर्ण केल्याने त्यांनी सपत्नीक सत्यनारायणाची पूजा केली होती.
खंडेराव महाराज हे मंदिर आधी पाच पावलीचे मंदिर म्हणून ओळखले जात असे. हे पुरातन मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात कुस्त्यांच्या मोठ्या दंगली यात्रेनिमित्त होत असत. पण रहिवास वाढला. गावातील मल्ल कमी झाले आणि या कुत्यांच्या दंगलीही मागे पडल्या. सन १९९९ साली मधुकर बडगुजर यांनी स्वखर्चाने या खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिराला जुने पुरातन रूप दिले. या यात्रा महोत्सवासाठी सुधाकर चौधरी, लोटन चौधरी, मधुकर बडगुजर, प्रा.डी.एन.सूर्यवंशी, चंदूलाल डागा, डी.बी.पाटील, एस.डी.पाटील, ए.टी. पाटील, रावसाहेब भोसले, आर.एम.बोरसे, एस.डी.पाटील, अरुण पाटील, भटेसिंग गिरासे, मधुकर पाटील, लक्ष्मण सरदार, एस.आर.पाटील, छोटू पाटील, जळगाव येथील सचिन माळी आदींनी परिश्रम घेतले.
रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.